हवेची गुणवत्ता सुधारली, मात्र ध्वनी प्रदुषणाने ठाणेकर हैराण
By अजित मांडके | Published: January 23, 2024 04:45 PM2024-01-23T16:45:50+5:302024-01-23T16:46:39+5:30
महापालिकेच्या पर्यावरण अहवालात शहरातील निवासी क्षेत्राची हवा ही मध्यम, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राची हवा समाधानकारक असल्याचे चित्र दिसून आले आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून प्रदुषण रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाय योजना केल्या जात आहेत. परंतु तरी देखील शहरातील प्रदुषणाची स्थिती ही वरखाली राहिल्याचे दिसून आले आहे. त्यात शहरात वाहनांची वाढत असलेली संख्या, मेट्रोच्या सुरु असलेल्या कामांमुळे आणि नव्याने होणाऱ्या बांधकामांमुळे ठाण्यातील हवेतील प्रदुषणात मागील वर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे चित्र आहे.
महापालिकेच्या पर्यावरण अहवालात शहरातील निवासी क्षेत्राची हवा ही मध्यम, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राची हवा समाधानकारक असल्याचे चित्र दिसून आले आहे. तर विविध २० चौकापैकी केवळ कोपरी प्रभाग समितीमध्ये हवा ही प्रदुषित गटात मोडली गेली आहे. तर पाणी विभागाद्वारे होणाऱ्या वितरण प्रणालीच्या पाण्याचे नमुन्याची गुणवत्ता मागील वर्षीपेक्षा २ टक्यांनी घसरल्याचे चित्र आहे. एकीकडे हवेतील प्रदुषणात घट होत असतांना दुसरीकडे ध्वनी प्रदुषणात मात्र वाढ झाल्याचे पर्यावरण अहवालात नमुद करण्यात आले आहे. तर शांतता क्षेत्रातही ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढल्याचे दिसून आले आहे. त्यातही सणांच्या काळात होणारे प्रदुषण हे अधिक असल्याचे वारंवांर नमुद करण्यात आले असून त्यावर केवळ कागदी घोडे नाचविण्यात पालिका धन्यता मानत आहे.
ध्वनी प्रदुषणात वाढ
ठाणे महापालिका हद्दीत मागील वर्षीच्या तुलेत यंदा देखील वाहनांच्या संख्येत ८ ते १० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यात दुचाकींची संख्या ही ७० हजार ८३२ एवढी आहे. तर मागील काही वर्षात इलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढतांना दिसत आहे. त्यानुसार मागील वर्षी ४६५२ इलेक्ट्रीक वाहने घेतली गेली आहेत. त्यात रस्त्यावर होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे, विनाकारण हॉर्न वाजविल्यामुळे, बांधकामांची सुरु असलेली कामे, सण उत्सवात मोठ्या आवाजात वाजणारे डीजे आदींमुळे ध्वनी प्रदुणषात वाढ होत असल्याचा निर्ष्कष पर्यावरण अहवालात मांडण्यात आला आहे. महापालिकेने शहरातील २० चौकांचे सर्व्हेक्षण केले असता, त्याठिकाणी ध्वनी प्रदुषणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. याशिवाय दिपावली आणि गणेशोत्सवाच्या काळात देखील ध्वनीची तीव्रता ही डेसीबल पेक्षाही अधिक आढळून आली आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत ध्वनी पातळीत २१ टक्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे. तर शहरातील शांतता क्षेत्रातही ध्वनी प्रदुषणात कमालीची वाढ झाल्याचे नमुद करण्यात आले आहे.
हवेची गुणवत्ता सुधारली
महापालिकेने केलेले शहरातील काही परिसराचे हवेची गुणवत्ता तपासली. या ठिकाणी हवेची गुणवत्ता मागील वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात सुधारल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे.
हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शहरातील २० चौकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार मागील वर्षीच्या तुलनेत हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी किसन नगर चौकातील हवेची गुणवत्ता २३९ एवढी होती. यंदा ती १३७ पर्यंत सुधारली आहे. तर कॅडबरी नाका, नितीन कंपनी, मुलुंड चेकनाका, बाळकुम नाका, गावदेवी नाका, कापुरबावडी नाका, रेतीबंदर, शिळफाटा, कल्याणफाटा या भागातील हेवेची गुणवत्ता देखील मागील वर्षीच्या तुलनेत बऱ्याच अंशी सुधारली आहे. मात्र कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात मागील वर्षी १३७ एवढी होती. यंदा मात्र त्याठिकाणी हवेची गुणवत्ता २०६ एवढी म्हणजेच प्रदुषित आढळली आहे. तर उपवन बसडेपो येथील हवा देखील मध्यम प्रदुषित गटात मोडली आहे. महापालिकेच्या माध्यमातून हवा प्रदुषण रोखण्यासाठी केलेल्या विविध उपाय योजनांमुळे हवेची गुणवत्ता सुधारल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे.
साठवणुकीच्या पाण्याची गुणवत्ता देखील तपासण्यात आली असून त्यानुसार २७ हजार ७९६ नमुने तपासण्यात आले असून त्यातील ८४ टक्के नमुने हे पिण्यायोग्य आढळले असून १६ टक्के नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर वितरण प्रणालीद्वारे पाण्याचे १३ हजार २४ नमुने तपासण्यात आले असून त्यातील १२ हजार ९९ नमुने हे पिण्यायोग्य आढळले आहे. तर ९२५ नमुने पिण्यास अयोग्य आढळले आहे. तर शहरातील विहिरींच्या पाण्याची तपासणी केली असता ते पाणी पिण्यायोग्य नसल्याचे आढळून आले आहे. शहरातील ५० कुपनलिकांची गुणवत्ता देखील पिण्यायोग्य नसल्याचे आढळून आले आहे.
तलावातील पाण्याच्या प्रदुषणात घट
तलावांचे प्रदुषण रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाय योजना केल्या जात आहेत. तलवांच्या संवर्धनासाठी महापालिकेने नियमितपणे विविध कामे केली जात आहेत. त्यानुसार गाळ काढणे, आजूबाजूचा परिसर साफ करणे, एरिएशन यंत्रणा उभारणे, प्रोबायोटीक उपचार पध्दतीचा अवलंब करणे आदींमुळे शहरातील ३५ तलावांच्या पाण्याची गुणवत्ता सुधारल्याचे दिसून आले.