'हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा' या साधनाचा नक्कीच उपयोग होईल : आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 03:21 PM2024-09-08T15:21:51+5:302024-09-08T15:22:16+5:30

या यंत्रणेमुळे मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करून तत्काळ करायचे बदल आणि दीर्घकाळात करायला लागणारे बदल याचे नियोजन करणे महापालिकेस शक्य होईल.

Air Quality Management System will certainly be used as a tool says Commissioner | 'हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा' या साधनाचा नक्कीच उपयोग होईल : आयुक्त

'हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा' या साधनाचा नक्कीच उपयोग होईल : आयुक्त

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : ठाणे शहराला एका बाजूला खाडी आणि दुसरीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांची साथ लाभली असल्याने इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत ठाण्यातली हवा चांगली असते. मात्र ही हवा सर्वकाळात उत्तम रहावी, यासाठी 'हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा' या नवीन ऑनलाइन साधनाचा नक्कीच उपयोग होईल, असे प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले 

उष्णता कृती आराखडा आणि नागरी पूर व्यवस्थापन नियोजन या दोन कृती आराखड्यांनंतर ठाणे शहरासाठी हवेची गुणवत्ता तपासून त्यात आवश्यक ते बदल सुचवणाऱ्या नवीन यंत्रणेची मोलाची भर पडली आहे. या यंत्रणेमुळे मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करून तत्काळ करायचे बदल आणि दीर्घकाळात करायला लागणारे बदल याचे नियोजन करणे महापालिकेस शक्य होईल. या सूचनांमुळे हिवाळ्यात हवेची आणखी चांगली स्थिती आपल्याला राखता येईल, असा विश्वासही आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला. ठाणे महानगरपालिकेसाठी कौन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर (सी ई ई डब्ल्यू) आणि युएसएड (USAID) यांनी संयुक्तपणे ही ऑनलाइन यंत्रणा विकसित केली आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या माहितीचा उपयोग नागरिकांनाही व्हावा, यासाठी लवकरच त्याची एक लिंक ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर देण्यात येणार असल्याचे आयुक्त राव यांनी जाहीर केले. 

हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी, वेगवेगळ्या शहरात अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार उपाययोजना करण्याची गरज असते. हवेचे प्रदूषण आणि वातावरण बदल यांचा अन्योन्य संबंध आहे. हे लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 'क्लीन एअर आणि बेटर हेल्थ' या प्रकल्पांतर्गत ठाणे महापालिकेसाठी 'हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा' तयार करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे ठाणे महापालिकेला हवा प्रदूषणाशी सामना करण्यासाठी योग्य अशी माहिती मिळेल. त्यातून उपाययोजना करता येतील. राज्यात अशाप्रकारे प्रथमच ही यंत्रणा सुरू होत आहे, असे प्रतिपादन 'यूएसएड इंडिया' या संस्थेचे उपसंचालक वर्गीस पॉल यांनी केले.

Web Title: Air Quality Management System will certainly be used as a tool says Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे