दिव्यात सोशल डिस्टेंसींगची ऐशी तैशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 04:05 PM2020-04-23T16:05:35+5:302020-04-23T16:09:54+5:30
एकीकडे ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना दुसरीकडे लॉकडाऊन असतांनाही अनेक जण त्याचे नियम पायदळी तुडवितांना दिसत आहेत. दिव्यात तर लॉकडाऊनचा पुर्ता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.
ठाणे : ठाणे महानगर पालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रु ग्णांच्या संख्येत भर पडत आहे. दुसरीकडे दिवा भागात पहिला रुग्ण सापडल्यानतर तो आता बरा देखील झाला आहे. परंतु असे असतांनाही येथे देखील पूर्ण लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. असे असले तरी लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत नागरीक रस्त्यांवर गर्दी करतांना दिसत आहेत. तसेच पालिका प्रशासनाने दिव्यात अत्यावश्यक सेवांच्या खरेदीसाठी व विक्र ीतही योग्य नियोजन न केल्यामुळे येथील रस्त्यावर जत्रेचे स्वरूप आले असून सोशल डिस्टंगसीची ऐशी तैशी होत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात महापालिकेकडून योग्य नियोजन न झाल्यास भयाण परिस्थती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचार बंदी लागू केली आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवेतील आस्थापनाच सुरु ठेवण्यात आली आहे. मात्र, असे असताना देखील दिव्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरीक रस्त्यावर गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसापासून ठाणे महानगर पालिका हद्दीत कोरोनाबाधित रु ग्णांचे संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यात याच पालिका क्षेत्रातील दिवा शहरात एक संशियत कोरोनाबाधित रु ग्ण आढळू आला होता. मात्र, त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने दिवावासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. तसेच महापालिकेकडून दिवा शहरातील अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यासाठी दुपारी १ ते ४ वाजेपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे. मात्र, वेळ ठरवून देतांना पालिका प्रशासनाकडून दिव्यात रस्त्यावर होणाऱ्या गर्दीचे नियोजनच करण्यात आले नसल्यामुळे दिव्यातील रस्त्यावर भाजी, दूध आणि अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या गर्दीचे नियोजन व त्यावर नियंत्रण ठेवण्याची विनंती सेव्ह दिवा फाउंडेशनचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केले. अन्यथा दिव्यात भयाण स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे.