अजय-अतुल यांच्या गाण्यांनी ठाणेकर सैराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 01:51 AM2018-05-01T01:51:34+5:302018-05-01T01:51:34+5:30
मराठी चित्रपट संगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या अजय-अतुल या संगीतकार जोडीचा लाइव्ह कॉन्सर्ट ऐकण्याची ठाणेकरांना पर्वणीच ठरली.
ठाणे : मराठी चित्रपट संगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या अजय-अतुल या संगीतकार जोडीचा लाइव्ह कॉन्सर्ट ऐकण्याची ठाणेकरांना पर्वणीच ठरली. आई भवानी, नदीच्या पल्याड, लख्ख पडला प्रकाश अशा गाण्यांनी त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध तर केलेच, परंतु यावेळी सादर झालेल्या सैराटच्या गाण्यांवर प्रेक्षकांना थिरकायलादेखील लावले.
रविवारी ठाणे-कळव्यातील रसिकांसाठी ‘अजय-अतुल लाइव्ह’ या कार्यक्र माचे मंदार केणी यांनी आयोजन केले होते. सैराट चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्ताने त्यांच्या चाहत्यांसाठी खास संगीताची मेजवानी उपलब्ध करून दिली. ‘नटरंग’ या नमनाने अजय-अतुल यांच्या संगीत मैफलीला सुरु वात झाली. त्यानंतर, देवीला वंदन करत ‘दुर्गे दुर्घट भारी’ हे लोकप्रिय गाणे त्यांनी सादर केले. ‘नवरी आली’, ‘वाट दिसू दे रे देवा’, ‘अभी मुझ मे कही’ अशी भावनिक गाणी, ‘अप्सरा आली’, ‘वाजले की बारा’ यासारख्या अत्यंत गाजलेल्या गाण्यांवर रसिकांना ताल धरायला भाग पाडले. यावेळी सैराट या चित्रपटातील आॅर्केस्ट्राशिवाय गायलेल्या गाण्यांवर रसिकांनी तेवढेच प्रेम केले. त्याचबरोबर रसिकांनी कधीही न पाहिलेल्या, ऐकलेल्या काही गाण्यांची कडवीही त्यांनी गायली.
या दोन तासांच्या संगीत मैफलीमध्ये अजय-अतुल यांच्या कारकिर्दीतील अजरामर अशी २०-२५ गाणी सादर झाली. या लोकप्रिय जोडीला साथ देण्यासाठी यावेळी इंडियन आयडॉलफेम अभिजित सावंत, तरु ण गायक दिव्यकुमार, गायिका योगिता गोडबोले-पाठक, प्रियंका बर्वे ही मंडळी उपस्थित होती. मराठी रसिक इतके सुजाण आहेत की, आमच्या प्रत्येक गाण्याची सुरु वात झाली की, त्यांना कळते, असे सांगत अगदी प्रामाणिकपणे आपली गाण्यावरची श्रद्धा अजय यांनी रसिकांसमोर मांडली. तसेच आपले वादक हे आपल्या कार्यप्रेमाचे प्राण असतात, त्यामुळे त्यांना आम्ही आमचे कुटुंब मानतो, अशी ग्वाही त्यांनी दिली.