मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांच्या बदनामी प्रकरणी अजय जया यांना अटक, नौपाडा पोलिसांची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Published: May 30, 2023 07:17 PM2023-05-30T19:17:59+5:302023-05-30T19:18:22+5:30
१४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या कुटूंबीयांची बदनामी केल्याप्रकरणी तसेच समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी धर्मराज्य पक्षाचे ठाणे शहर संघटक अजय जया यांना अटक केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी मंगळवारी दिली. त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यातील 'प्रशांत कॉर्नर' या मिठाईच्या दुकानावर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने २५ मे रोजी कारवाई केली होती. या कारवाईचा संबंध एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांच्याशी जोडून शिंदे कुटूंबीयांची बदनामी करण्याचे षडयंत्र अजय जया यांनी केल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात २८ मे २०२३ रोजी दाखल झाली होती. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात कलम १२०- ब- नुसार कट कारस्थान रचणे, सोशल मिडियाद्वारे दुकानात वाद झाल्याची अफवा पसरविल्याने कलम ५०५ (२) नुसार तेढ निर्माण करणे आणि कलम ५०० नुसार बदनामी केल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात पोलीस निरीक्षक आनंद निकम यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अटक केली. ठाणे न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे त्यांची रवानगी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.