भिडे गुरुजींच्या निषेधार्थ ठाण्यात अजित पवार गटाच्या NCPचे धरणे आंदोलन; अटक करण्याची मागणी
By सुरेश लोखंडे | Published: July 31, 2023 03:16 PM2023-07-31T15:16:41+5:302023-07-31T15:17:41+5:30
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या या गटाने भिडे यांच्या विरोधात विविध घोषणा देत निदर्शने केली.
सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: साईबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी ठाण्यातील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी तीव्र आंदोलनाव्दारे आज केली आहे.
येथील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या या गटाने भिडे यांच्या विरोधात विविध घोषणा देत निदर्शने केली. यावेळी त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन देऊन भिडे यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. साईबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याबद्दल भिडे यांचा जाहीर निषेध आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहाजवळ केले. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) च्या शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन जोरदार धरणे आंदोलन छेडले.
राज्यातील अकोला, परभणी आदी ठिकाणी भिडे यांनी बेताल वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी आक्रमक होत भिडे यांना अटक करण्याची मागणी ठाण्यात केली आहे. संभाजी भिडे करतात काय, खाली डोके वरती पाय, संभाजी भिडे हाय हाय आदी घोषणा देऊन जिल्हाधिकारी परिसर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. या आंदोलनात स्वतः आनंद परांजपे यांच्यासह युवक अध्यक्ष विरु वाघमारे, प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, परिवहन सदस्य नितीन पाटील, अल्पसंख्याक अध्यक्ष हुसेन मणियार, कार्यकारिणी सदस्य अजित सावंत, मनोज कोकणे, दिनेश मेहरोल, विजय भामरे, साईप्रसाद प्रभू, विवेक गोडबोले, दिनेश दळवी.संतोष घोणे, सचिन गलांडे, निलेश फडतरे, निलेश कदम, समीर पेंढारे, कौस्तुभ धुमाळ, महिला पदाधिकारी अरुणा पेंढारे, सुधर्णा खिलारी, सुशीला नाटेकर, रत्ना वाघमारे, सुनीता गायकवाड, जया कडू, अर्चना कदम, स्मिता साळूंखे, सुनीता साळुंखे, प्रमिला खैरे, हंसा पांचाळ आदी पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.