गायनाचार्य पं ए के अभ्यंकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 12:58 PM2018-04-10T12:58:56+5:302018-04-10T12:58:56+5:30
गायनाचार्य पं. अच्युत केशव अभ्यंकर उर्फ पं. ए के अभ्यंकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने सोमवार (9 एप्रिल) निधन झाले.
ठाणे : गायनाचार्य पं. अच्युत केशव अभ्यंकर उर्फ पं. ए के अभ्यंकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने सोमवार (9 एप्रिल) निधन झाले. गेली अनेक वर्षे ठाणे (पूर्व) येथे वास्तव्यास असलेल्या पं. अभ्यंकर यांचे रात्री 8 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. किराणा घराण्यातील पं फिरोज दस्तूर यांचे जेष्ठ शिष्य असलेल्या पं अभ्यंकरांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
1964 साली ठाण्यात स्थायिक झालेले पं अभ्यंकर हे त्यांच्या गायकीसाठी देश-परदेशात प्रसिद्ध होते. ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनचे नामवंत गायक असलेले पं अभ्यंकर हे गायनाच्या प्रचार आणि प्रसारासाठी 1992 ते 1995 सालापर्यंत मुंबई विद्यापीठात हिंदुस्थानी संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते.
पं अभ्यंकर यांच्या तालमीत ठाण्यातील अनेक नावाजलेले गायक आणि गायिका गायकीचे धडे घेतले. डॉ वरदा गोडबोले, लीला शेलार, विभावरी बांधवकर, मधुवंती दांडेकर, प्रणव पटवर्धन हे यापैकी काही. पं. अभ्यंकर हे ठाणे पूर्व इथल्या संस्कार भारती, शृंगार संगीत, स्वरदायिनी ट्रस्ट, नादसारिता, संगीत संकल्प, चिंतामणी संगीत सभा आदी संस्थांचे अध्यक्ष अथवा महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. पं अभ्यंकर याना सुरमणी, गायनाचार्य, संगीत ऋषी या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ठाणे महापालिकेतर्फे 2006 साली ठाणे गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.