“अक्षयबद्दल खोट्या गोष्टी पसरवल्या जातायत, तो निर्दोष आहे”; आई-वडिलांनी केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 12:20 PM2024-08-22T12:20:10+5:302024-08-22T12:20:36+5:30
Badlapur School Case: बदलापूर घटनेबाबत मुंबईसह राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना, त्याच्या आई-वडिलांनी धक्कादायक खुलासे केल्याचे सांगितले जात आहे.
Badlapur School Case: बदलापूरच्या शाळेतील घटनेनंतर आता राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. शाळांमधील मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करणारा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परंतु, आरोपी अक्षय शिंदे हा निर्दोष असल्याचा दावा त्याच्या आई-वडिलांनी केला आहे.
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणात अनेक ट्विस्ट पाहायला मिळत असून, काही खळबळजनक खुलासे होत आहेत. आरोपी अक्षय शिंदेची तीन लग्न झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, अक्षयच्या पत्नी त्याला सोडून गेल्याचे समोर आले होते. परंतु, अक्षयबद्दलचे दावे त्याच्या कुटुंबियांनी फेटाळून लावले आहेत. आई-वडिलांनी काही खुलासे करत, अक्षय निर्दोष असून, त्याच्याबाबत खोट्या गोष्टी पसरवल्या जात असल्याचे म्हटले आहे.
आमचे सर्व कुटुंब शाळेत काम करायचे
अक्षयचे तीन विवाह झाले आहे, ही गोष्ट खोटी आहे. अक्षयला कामाला लागून आता फक्त पंधरा दिवस झालेत. १३ तारखेला या प्रकरणाबाबत आम्हाला माहिती मिळाली. अक्षयला १७ तारखेला पकडून घेऊन गेले. याबाबत आम्हाला काहीच सांगितले नाही. शाळेत काम करणाऱ्या एका बाईने आम्हाला सांगितलं की, अक्षयला पकडून नेले. आम्हाला समजल्यानंतर तिथे गेलो, तर पोलीस अक्षयला मारत होते. आम्ही पोलीस ठाण्यात गेलो, त्यावेळी पोलिसांनी त्या घटनेबाबत सांगितले. आमच्या घरातील सगळ्यांना मारहाण झाली आहे. अक्षयकडे फक्त ११ वाजता शाळेतील बाथरूम धुवायचे काम होते. दुसरे काहीच काम त्याच्याकडे नव्हते. आमचे सर्व कुटुंब शाळेत काम करायचे. शाळेत झाडू मारण्याचे काम आमच्याकडे होते. संध्याकाळी शाळा सुटल्यावर आम्ही शाळेत जायचो आणि काम आटपून घरी परतायचो. अक्षय पहिल्यापासून डोक्यामध्ये जरा कमजोरच होता, त्याला गोळ्या-औषधे सुरू होती, असे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले. एबीपीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दरम्यान, बदलापूर येथील शाळेतील प्रकाराच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या रेल रोको आंदोलनाचा हवाला देत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाती दखल घेतली. लोकांनी आवाज उठवल्यानंतरच महाराष्ट्र पोलीस महिला आणि मुलांवरील गुन्ह्यांची चौकशी करणार का? जोपर्यंत लोक विरोध करत नाहीत तोपर्यंत तुमचा विभाग तपास करणार नाही का? लोकांनी आंदोलन केल्याशिवाय महिलांवरील महिलांवरील गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेणार नाही, असा संदेश महाराष्ट्र राज्य देऊ पाहत आहे का? दररोज आम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकरणाची सुनावणी घेत आहोत, अशी संतप्त प्रतिक्रिया अजय गडकरी आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने देत पोलिसांना चांगलेच फटकारले.