बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
By जितेंद्र कालेकर | Published: September 24, 2024 08:53 PM2024-09-24T20:53:46+5:302024-09-24T20:55:15+5:30
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय हा पाेलिसांच्या चकमकीत मारला गेल्यानंतर त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयात उतरीय तपासणीसाठी नेण्यात आला हाेता.
ठाणे: ठाणे पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या अक्षय शिंदे याचा मृतदेह त्याचे नातेवाईक अखेर बुधवारी ताब्यात घेणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या शवागरात त्याचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी ठेवण्यात आला. त्याच दरम्यान मुंब्रा पोलिसांनी संपर्क साधल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी ही माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, नियतीने बदलापूर अत्याचार प्रकरणातील पिडित चिमुरडींना न्याय दिला, अशी भावना व्यक्त करीत धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीला ठाण्याचे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्यासह शिवसैनिकांनी मंगळवारी आदरांजली वाहिली.
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय हा पाेलिसांच्या चकमकीत मारला गेल्यानंतर त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयात उतरीय तपासणीसाठी नेण्यात आला हाेता. शवविच्छेदनानंतर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह पुन्हा कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणण्यात आला. परंतू, अक्षय याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याचे काेणीही नातेवाईक रात्री आलेले नव्हते. त्यामुळे मुंब्रा पोलिसांनी त्याचे वडिल अण्णा शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी बुधवारी आपण त्याचा मृतदेह ताब्यात घेणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली.
दरम्यान, ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. या जिल्ह्यात महिलांवर वाकडी नजर करणाऱ्यांना दिघे ज्या पद्धतीने धडा शिकवत होते, आज नियतीने बदलापूर अत्याचार प्रकरणातील पिडित चिमुरडींना न्याय दिला. दिघे यांचे शिष्य राज्याचे मुख्यमंत्री आहेत. समाजातील सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. बदलापूर प्रकरणातील नराधमाचा पोलीसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. याबाबत ठाण्यातील शिवसैनिकांनी खासदार म्हस्के यांच्या नेतृत्वात जल्लोष केला. यावेळी शिवसैनिकांनी दिघे यांच्या ठाण्यातील समाधीस्थळी जाऊन पुष्पांजली वाहिली. यावेळी शिवसैनिकांनी पोलिसांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला.