माजिवडा, मानपाडा, नौपाडासह कळव्यात धोक्याची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:43 AM2021-03-09T04:43:45+5:302021-03-09T04:43:45+5:30
ठाणे : वर्षभरापासून ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी-अधिक प्रमाणात वाढताना दिसत आहे; परंतु आता मार्च महिन्यातही दिवसाला २०० ...
ठाणे : वर्षभरापासून ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी-अधिक प्रमाणात वाढताना दिसत आहे; परंतु आता मार्च महिन्यातही दिवसाला २०० हून अधिक रुग्ण रोज नव्याने सापडत असल्याने महापालिकेची चिंता वाढू लागली आहे. यामध्ये माजिवडा - मानपाडा, कळवा, वर्तकनगर, नौपाडा या भागातही पुन्हा कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. असे असले तरी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यात महापालिकेला कुठेतरी यश येताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात केवळ २७ तर मार्च महिन्यात पहिल्या सात दिवसात सात जणांचाच मृत्यू झाला आहे. रुग्ण वाढत असताना ते बरे होण्याचे प्रमाणही ९६ टक्क्यांच्या आसपास आहे.
गेल्या मागील मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ठाण्यात आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत ६३ हजार ६८१ रुग्ण बाधित झाले आहेत. तर तब्बल एक हजार ४०० जणांचा मृत्यू झाला असून, ६० हजार ३९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या एक हजार ९४८ एवढी आहे. सुरुवातीला कोरोनावर काय उपचार करावेत, मृत्युदर कसा रोखावा, यासाठी महापालिकेच्या यंत्रणेबरोबर खासगी यंत्रणादेखील चाचपडत होती; परंतु आता कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी ते बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण जास्त असल्याची माहिती महापालिकेने दिली. गेल्या मार्च महिन्यात रोज रुग्ण आढळण्याचे प्रमाण सरासरी १० एवढे होते, तर बरे होण्याचे प्रमाण हे २ एवढेच होते. तर आताच्या मार्च महिन्यात रोज रुग्ण आढळण्याचे सरासरी प्रमाण १८७ च्या आसपास असले तरी ते बरे होण्याचे प्रमाण हे १४६ एवढे आहे. तर मागील एप्रिल महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९.७३ टक्के एवढे होते. तेच आता मार्च महिन्यात ९५.०९ टक्के एवढे असल्याचे दिसत आहे. मागील एप्रिल महिन्यात १७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर हे प्रमाण जूनमध्ये सरासरी ३१७ वर गेले होते. तर आता हेच प्रमाण ७ च्या आसपास दिसत आहे.
महापालिकेने आजही कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी केलेले नाही. मागील वर्षी एप्रिल महिन्यात रोज सरासरी १९३ चाचण्या केल्या जात होत्या. तर जेव्हा रुग्णांची संख्या वाढत गेली तेव्हा हे प्रमाण दिवसाला साडेपाच हजारच्या घरात गेले होते. तर आजघडीला दिवसाला सरासरी चार हजार ६३९ चाचण्या केल्या जात आहेत. मागील एप्रिल महिन्यात रुग्णवाढीचा दर हा सरासरी ६.६० टक्के होता. जून महिन्यात तो २०.८४ टक्क्यांच्या घरात गेला होता. तर आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात तो ५.५८ टक्के एवढा आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी अर्थात डबलिंग रेट ८.२५ दिवसांचा होता. तोच जूनमध्ये ३२.३६ दिवसांवर गेला होता. आता मार्च महिन्यात हाच दर २६५ दिवसांवर आला आहे; परंतु जानेवारी महिन्यात डबलिंगचा दर ५०८ दिवसांवर गेला होता. तो आता खाली आल्याचे दिसत आहे, तर गेल्या एप्रिल महिन्यात मृत्यूदर हा ५.४८ टक्के होता. तोच आज ०.७५ टक्के एवढा आहे. कोरोना रोखण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज असून, पुन्हा आपले कोरोना सेंटरही सज्ज केले आहेत.
चौकट - मागील वर्षी माजिवडा - मानपाडा, वागळे, लोकमान्य सावरकर नगर, कळवा, नौपाडा, उथळसर, वर्तकनगर येथे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत होते. मधल्या काळात महापालिकेने येथे केलेल्या उपाययोजनांमुळे येथील नव्याने रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले होते; परंतु आता पुन्हा माजिवडा - मानपाडा, नौपाडा, वर्तकनगर, नौपाडा आदी भागात कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पालिकेने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.