कसारा घाटात प्रवाशांसाठी धोक्याची घंटा, खचलेला रस्ता, डोकावणाऱ्या दरडीमुळे धोका कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 10:23 AM2020-06-19T10:23:43+5:302020-06-19T11:32:14+5:30
मुंबई-नाशिक महामार्गावर मागील वर्षी २७ जुलै २०१९ रोजी कसारा घाट (दोन्ही मार्गावर) मोठया प्रमाणात खचला होता.
शाम धुमाळ
कसारा - मुंबई नाशिक आग्रा या राष्ट्रीय महामार्गावर असलेले खड्डे, त्या पाठोपाठ मागील वर्षी एक किलोमीटर चा दोन ठिकाणी खचलेला कसारा घाटातील रस्ता आज ही जैसा थे आहे तर दोन्ही घाटातील दरडी डोकावत असल्याने त्या पडायच्या स्थितीत आहे ,त्या मुळे या वर्षी देखील या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी धोक्याची घंटा कायम आहे, एकीकडे कोरोनाच्या प्रादूरभावाणे सर्वत्र धुमाकूळ घातला असताना राष्ट्रीय महामार्गावरील भिवंडी ते गोंन्दे या महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून आपघाताचे प्रमाणही वाढले आहे. एक वर्षापासून दुरवस्थेत असलेल्या या महामार्गावर टोलवसुली कायम असून सद्या मुंबई नाशिक महामार्ग प्रवासासाठी धोकादायक ठरत आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर मागील वर्षी २७ जुलै २०१९ रोजी कसारा घाट (दोन्ही मार्गावर) मोठया प्रमाणात खचला होता. या धोकादायक रस्त्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने १० महिन्यात १५ वेळा पाहणी करून सर्व्हे केला तर या महामार्गाचा ठेका घेतलेल्या पीक इन्फ्रा कंपनीने तर अनेकदा पहाणी केली. परंतु, १० महिन्यात कसारा घाटासह, भिवंडी वडपा ते गोंदे या दरम्यान दुरावस्थेत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची काडीमात्र दुरुस्ती न करता प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू ठेवत महामार्गावर टोल वसुली नियमितपणे सुरू ठेवली. पीक इन्फ्रा कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे भिवंडी ते गोंदे दरम्यान वर्षभरात १७० दुचाकी तर, ५० हुन अधिक मोठया वाहनाचा आपघात झाला असून १७ बळी गेले आहेत. तर अनेकजण जखमी झाले, काहींना अपंगत्व आले. या रस्त्यावरील अनेक त्रुटी या अपघातांना कारणीभूत ठरत असून यंदाच्या पावसाळ्यात प्रवासी व नागरिकांमध्ये भिती कायम आहे.