अलार्म वाजला अन् कामगार सैरावैरा पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:13 AM2020-02-19T01:13:39+5:302020-02-19T01:14:33+5:30
जेवणाच्या सुटीत घडली दुर्घटना : जळणारी कंपनी पाहून अनेकांना आले रडू
अनिकेत घमंडी
डोंबिवली : ‘मेट्रोपॉलिटियन एक्सिम केमिकल्स’ या कंपनीत दुपारी १२.४५ च्या सुमारास आग लागली. तेव्हा पहिल्या शिफ्टमधील ५५० कामगार कंपनीतच होते. त्यांची दुपारच्या जेवणाची सुटी झाली होती. अचानक कानठळ्या बसवणारा आवाज झाल्याने होताच सर्वांचीच पाचावर धारण बसली. नेमके काय झाले हे कुणालाच कळत नव्हते. तोच काहींनी आगीचा लोळ उठताना पाहिला आणि अलार्म वाजला. त्यानंतर जेवण जागेवरच सोडून प्रत्येकाने मिळेल त्या वाटेने कंपनीच्या गणवेशावरच बाहेर पळ काढला. गेटमनने घाईघाईतच चेक करून कामगारांना बाहेर काढले.
कंपनीत हेल्पर असलेल्या विशालकुमार सोनी म्हणाले की, आग लागली तेव्हा मी कंपनीत काम करत होतो. स्फोट झाला तेव्हा तातडीने आम्ही बाहेरच्या दिशेने पळालो. एकामागोमाग एक स्फोट होते. काहीच कळत नव्हते. आम्ही फक्त जीवाच्या आकांताने धावत होतो. मोबाइल, कंपनीचा गणवेश कस्टडीत ठेवला होता. गणवेशावरच बाहेर पडलो. मोबाइल नसल्याने कोणाला संपर्कही होत नव्हता. दुपारी ३.३० वाजल्यानंतर मोबाइल मिळाला. त्यानंतर सुखरूप असल्याचे सांगताच घरच्यांचा जीव भांड्यात पडला.
कंपनीतील या स्फोटाने पुन्हा प्रोबेस दुर्घटनेच्या आठवणी जाग्या झाल्या. तीन शिफ्टमध्ये कंपनीत काम चालते. हेल्परला १२ तासांची, तर कुशल कामगारांना आठ तासांची ड्युटी आहे. कंपनीच्या बाहेर पडलेले कामगार संध्याकाळी ५ वाजल्यानंतरही कंपनीच्या परिसरातच घुटमळत होते. जीव वाचल्याचा आनंद व्यक्त करायचा की कंपनी खाक झाल्याने रोजगाराची चिंता करायची, याचा तणाव प्रत्येक कामगाराच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. बेरोजगारीच्या चिंतेने अनेकांना रडूही कोसळले.
वेल्डिंगच्या ठिणगीने केला घात?
भारतीय मजदूर संघाची या कंपनीत युनियन आहे. युनियनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीत स्टोअररूममध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते. तेथेच ६०० टन कच्चा मालही होता. वेल्डिंगचे काम सुरू असताना पडलेल्या ठिणगीने आग लागली. सुरुवातीला आगीचे प्रमाण कमी होते, पण वेळीच तेथील कच्चा माल हटवणे शक्य न झाल्याने आगीने काहीवेळातच रौद्ररूप धारण केले. त्यानंतर एकामागोमाग एक स्फोट झाले. आग लागण्याचे हे एक कारण पुढे आल्याने रासायनिक कंपन्यांचा सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.