ठाणेकरांसाठी धोक्याची घंटा आठवडा भरात, ३०१ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 02:50 PM2020-05-09T14:50:40+5:302020-05-09T14:53:52+5:30
ठाणे महापालिका हद्दीत मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढतांना दिसत आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. मागील आठ दिवसात शहरात ३०१ नवीन रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण ठाण्यातील झोपडपटटी भागातील आहेत.
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत मागील आठवडा भरात कोरोनाचा रुग्णांची संख्या गुणाकाराने वाढतांना दिसत आहे. आतापर्यंत पालिका हद्दीत ६५० च्या आसपास रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मागील आठवडा भरात तब्बल ३०१ रुग्ण वाढल्याची माहिती पालिकेच्या आकडेवारीवरुन समोर येत आहे. त्यातही यामध्ये पुरुषांची संख्या ही अधिक असून महिलांचे प्रमाण यात कमी असल्याचे दिसून आले. मागील काही दिवसात ३० ते ६५ पर्यंतचे रुग्ण एका दिवसात वाढल्याचे दिसून आले आहे.
ठाणे शहरात २१ मार्चपासून लॉकडाऊन झाल्यानंतर या महिन्यात साधारणपणे एखादा दुसरा रुग्ण रोज शहरात आढळत होता. एप्रिल मध्ये हे प्रमाण काहीसे वाढल्याचे दिसून आले. मार्च आणि एप्रिल महिन्यात शहरात ३०० च्या आसपास रुग्ण होते. दिड महिन्यात ३०० च्या आसपास रुग्ण होते. मात्र मे महिना उजडला आणि रुग्णांच्या संख्येत गुणाकाराने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मागील ८ दिवसात रुग्णांची संख्या तब्बल ३०१ ने वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता ही ठाण्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यातही सुरवातीला सोसायटीमध्ये काही प्रमाणात रुग्ण आढळत होते. परंतु एप्रिल अखेर पासून कोरोनाने झोपडपटटीत शिरकाव केल्याने कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतांना दिसत आहे. त्यामुळेच आता कोरोना ठाणेकरांसाठी धोक्याची घंटा ठरली आहे. लोकमान्य सावरकर नगर आणि वागळे या दोन प्रभाग समितीत मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याचे दिसून आले असून या दोन प्रभाग समितीमध्येच कोरोनाचे २५० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. वागळे प्रभाग समितीत आजच्या घडीला ११० हून अधिक तर लोकमान्य नगरमध्ये १६० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर नौपाडा आणि कोपरतही ही संख्या ६० च्या वर गेली आहे. मुंब्य्रात हे प्रमाण ८० पर्यंत आले आहे. परंतु इतर प्रभाग समितींच्या तुलनेत लोकमान्य आणि वागळे या पटयात झोपडपटटी भागातच कोरोनाचा जोरदार शिरकाव अधिक प्रमाणात झाल्याचे दिसत आहे. तर यामध्ये ३७८ हे पुरुष असून २३३ महिलांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत २१ जणांचा मृत्यु झाला आहे. एकूणच मागील काही दिवसात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे.
दरम्यान पालिकेने हायरिस्क मध्ये ठेवलेल्या तब्बल ८०० जणांपैकीच आता टप्याटप्याने एका एकाचे रिपोर्ट हे पॉझीटीव्ह येत आहेत. त्यामुळे आता हा आकडा आणखी किती वाढणार हे या हायरिस्कमध्ये ठेवलेल्या नागरीकांच्या आकडेवारीवरुन समोर येऊ शकणार आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
कोरोना वाढीचा तक्ता आठ दिवसांचा
०१ मे - ३१०
०२ - ३७१
०३ - ३८९
०४ - ४१२
०५ - ४५२
०६ - ४९६
०७ - ५६१
०८ - ६११