केडीएमसी पार्किंगमध्ये दारू पार्ट्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 12:38 AM2019-07-25T00:38:40+5:302019-07-25T00:39:01+5:30
‘ब’ प्रभाग क्षेत्रातील प्रकार : कचरा गाड्यांऐवजी दुचाकी, रिक्षा राहत आहेत उभ्या
कल्याण : पश्चिमेतील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ब’ प्रभाग क्षेत्रातील पार्किंगची जागा महापालिकेने कचरा गाड्यांसाठी दिली आहे. मात्र, तेथे या गाड्यांऐवजी रिक्षा व दुचाकी बेकायदा उभ्या केल्या जात आहेत. या पार्किंगमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्याने दारूच्या पार्ट्या झोडल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी बुधवारी या पार्किंगची अचानक पाहणी केली. यावेळी हा प्रकार उघडकीस आला. हे पार्किंग खडकपाडा पोलीस ठाण्यासमोरच आहे. एका बिल्डरला दिलेल्या इमारत परवानगीत ही पार्किंगची जागा महापालिकेस सर्वसमावेशक आरक्षणात विकसित करून देण्यात आली.
महापालिकेने चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे कंत्राट आर अॅण्ड डी या कंपनीला दिले आहे. महापालिकेने पार्किंगची जागा या कंपनीला त्यांच्या कचरा गाड्या उभ्या करण्यासाठी दिली आहे. मात्र, तेथे कचरा गाड्या कमी आणि खाजगी दुचाकी व रिक्षाचालक त्यांच्या गाड्या तेथे उभ्या करत असल्याचे पाहणीच्या वेळी आढळून आले. त्याचबरोबर तेथे दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळल्या. त्यामुळे रात्रीच्या वेळी तेथे दारूच्या पार्ट्या झोडल्या जात असल्याचे यावरून उघड झाले आहे.
पार्किंगचा गैरवापर करणाऱ्या रिक्षा व दुचाकी चालकांकडून हा प्रकार सुरू आहे की, कचरा गाड्यांवर काम करणारे चालक, वाहक आणि कामगार ओल्या पार्ट्या करून गाडीवर काम करीत आहते, असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी कचरा गाड्यांवर नगरसेवकांनी छापा टाकली होती. त्यावेळी अनेक चालकांनी गणवेश घातलेला नव्हता. तसेच त्यांच्या हातात सुरक्षिततेची साधने नव्हते. त्यामुळे गाडीवरचा चालक आहे की रस्त्यावरचा कोणी टपोरी, असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्याच कामगार दारू पार्ट्या झोडून कचरा उचलण्याचे काम करत असतील, तर ही बाब गंबीर आहे. अशा प्रकारांमुळे महापालिका प्रशासनाची बदनामी होत आहे. शिवाय मद्यपान करून गाडी चालविल्याने रस्त्यावर एखादा अपघात होऊन पादचारी, प्रवासी, तसेच गाडीवरील कामगारांचा नशेमुळे जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, विश्वनाथ राणे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अमित पंडित यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार त्यांच्या कानावर घातला आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही राणे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भात पंडित यांना विचारले असता ते म्हणाले, याप्रकरणी सविस्तर अहवाल मागविला आहे. दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल.
कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही. पार्किंगच्या जागेचा गैरवापर होत असेल तर गैरवापर करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल.