उल्हास नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:58 PM2019-08-03T23:58:06+5:302019-08-03T23:58:13+5:30
रायता येथील उल्हास नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद; कल्याण-मुरबाड-नगर वाहतूक अन्य मार्गाने, १२ गावांचा संपर्क तुटला, शेतीचे प्रचंड नुकसान
म्हारळ : पावसाने शुक्रवारी रात्रीपासून पुन्हा जोर धरल्याने कल्याण तालुक्यातील १० ते १२ गावांचा संपर्क तुटला आहे. उल्हास नदीची पातळी वाढल्याने रायता पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कल्याण-मुरबाड महामार्ग आठवड्यात तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक गोवेली-आंबिवली-शहाडहून कल्याण, अशी वळवण्यात आली.
पावसामुळे आपटी, मांजर्ली, दहागाव, पोई, केळणी, वाहोली, बापसई, मामनोली, रायते, दहिवली, चौरे, अंताडे आदी गावांचा संपर्क तुटला. दुसरीकडे कल्याण-मुरबाड महामार्ग कांबा ते टाटा पॉवर हाउसदरम्यान दोनतीन फूट पाणी साचले होते. परिणामी, वाहतुकीवर परिणाम झाला. उल्हास नदीची पातळी वाढल्याने आणि भरतीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने कल्याण-मुरबाड महामार्गावरील कल्याणकडून येणारी वाहतूक म्हारळ येथेच थांबण्यात आली. ही वाहतूक उल्हासनगरमार्गे वळवण्यात आली. तर, मुरबाडहून येणारी वाहतूक गोवेलीहून टिटवाळा-आंबिवली-शहाडमार्गे कल्याण अशी वळवण्यात आली. प्रशासनाने नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. शासकीय यंत्रणेसोबत एनडीआरएफची टीमही अलर्ट होती.
म्हारळ येथील सखल भागांतील म्हारळ सोसायटी, शिवानीनगर, बोडके चाळ, अण्णासाहेब पाटीलनगर, साईदीप कॉलनीत सकाळी पाणी भरले. त्यामुळे गटारांतील पाणी नागरिकांच्या घराघरांमध्ये घुसल्याने रहिवाशांचे हाल झाले. म्हारळमध्ये कचराकुंड्या नसल्याने ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले आहेत. त्यामुळे वारंवार पावसाचे पाणी तुंबत असल्याने रोगराई पसरण्याचा धोका वाढतच असल्याचे मनसे कार्यकर्ते विवेक गंभीरराव यांनी सांगितले.
शहाड येथेही सकाळी मोहना रोडवर दोन फूट पाणी आले. गटाराचे पाणी परिसरातील गुरु दर्शन, मधुसूदन, अंबिकानगर सोसायट्यांमध्ये गुडघाभर पाणी साठले होते. शिवाय, म्हारळ येथे वाहतूक थांबवल्याने शहाड पुलावर वाहनांच्या रांगा पाहावयास मिळाल्या. त्यामुळे शहाड-बिर्ला गेट येथे प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली. दरम्यान, उल्हास नदीच्या पुराचे पाणी आपटी, मांजर्ली, आणे आणि रायते गावांतील शेतात शिरल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मी स्वत: परिसरात फिरून परिस्थितीची पाहणी करीत आहे. एनडीआरएफची टीमही सतर्क आहे.
- दीपक आकडे, तहसीलदार, कल्याण