भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडल्याने सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 02:33 AM2019-08-04T02:33:05+5:302019-08-04T02:33:27+5:30
कल्याण-अहमदनगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील नद्या पुराच्या पाण्यामुळे शनिवारी दुथडी भरून वाहत होत्या. सततच्या पावसामुळे भातसा धरणाचे पाच दरवाजे २.५० मीटर इतके उघडण्यात आले. धरणातून भातसा नदीत सुमारे ९३४ क्युसेस पाणी सोडण्यात आले होते.
या नदीच्या काठावरील शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल, सापगाव व नदीकाठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. या काळात वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याच्या व दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी दिल्या आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ८९० मिमी पाऊस पडला. या पावसाची सरासरी १२७.१४ मिमीनोंद घेण्यात आली.
दरम्यान, ठाणे येथे दोन व उल्हासनगर येथील एकाचा पावसादरम्यान मृत्यू झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाने सांगितले. यामध्ये ठाणे येथील मनोरुग्णालयाच्या वसाहतीमधील संतोष जाधव (१८) हा तरुण घरात पाणी शिरले असता फ्रीज हलवत असताना विजेचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. तर, दिवा येथील डीजे कम्पाउंडजवळील नाल्यात सुनीत पुनीत (३०) हा तरुण नाल्यात पडून दगावला. तर, उल्हासनगर येथील गौरीपाडा येथील मनीष चव्हाण या तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. तर, उल्हासनगर येथील कॅम्प नंबर १मध्ये एका बालिकेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
जिल्हाभरातील या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. मात्र, निर्णय घेण्यास विलंब झाल्यामुळे काही शाळा सुरू झाल्या होत्या. या दरम्यान शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना घरी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शाळांवर सोपवली होती. रेल्वेसेवा पार कोलमडली आहे. सकाळच्या कालावधीत काही ठिकाणी उपनगरीय गाड्यांची सेवा काही काळ बंद करावी लागली. ठाणे स्टेशन परिसरात रेल्वेरुळांवर पाणी साचले होते. त्यानंतर, दुपारी सुमारे दीड तास उशिराने उपनगरीय गाड्यांची वाहतूक सुरू राहिली.
सकाळच्या कालावधीत उल्हास नदीच्या पुराचे पाणी वाढल्यामुळे कल्याण-अहमदनगर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. या महामार्गावरील माळशेज घाटातील अंबेवळणावर एक झाड पडले. ते त्वरित हटवण्याचे कामही महामार्ग बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्याचे उपकार्यकारी अभियंता सुनील पाटील यांनी सांगितले.
कल्याण रेल्वेस्थानकातील छतगळतीमुळे प्लॅटफॉर्मवर पाणीचपाणी झाल्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यात अडथळा निर्माण झाला.याशिवाय कल्याण स्टेशन परिसरातही पाणी साचले. तर, टाटा पॉवर हाउस, वरपगाव, म्हारळ, कांबा, टिटवाळा परिसरातील रुंदे आदी परिसरांत पाणी साचले.
सर्वाधिक शहापूर तालुक्यात
सर्वाधिक पाऊस शहापूर तालुक्यात १४० मिमी, भिवंडी तालुक्यात १३० मिमी, कल्याणला १५८, मुरबाडला १२५, अंबरनाथला ११२, उल्हासनगरला १०८ आणि ठाणे शहरात ११७ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९७.०२ टक्के पाऊस पडला.