नितीन वारिंगे हत्येतील सर्व आरोपी निर्दोष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 12:49 AM2019-03-08T00:49:48+5:302019-03-08T00:50:01+5:30

अंबरनाथमधील शिवसेना नगरसेवक नितीन वारिंगे यांची २०११ मध्ये हत्या करण्यात आली.

All the accused in the murder of Nitin Waringe are innocent | नितीन वारिंगे हत्येतील सर्व आरोपी निर्दोष

नितीन वारिंगे हत्येतील सर्व आरोपी निर्दोष

googlenewsNext

अंबरनाथ : अंबरनाथमधील शिवसेना नगरसेवक नितीन वारिंगे यांची २०११ मध्ये हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी सहा आरोपींना अटक झाली होती. या प्रकरणाचा निकाल गुरुवारी कल्याण न्यायालयात लागला. या सहाही आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दाेष सोडण्यात आले आहे. त्यातील एका आरोपीचा याआधीच अपघातात मृत्यू झाला आहे.
वारिंगे यांचा भाचा समीर गोसावी याची २००९ मध्ये पेट्रोलपंपावर हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात भालचंद्र भोईर आणि त्यांच्या तीन भावांसह काही कुटुंबीयांना तुरुंगात जावे लागले होते. या हत्येचा पाठपुरावा वारिंगे करत असल्याने त्यांचा काटा काढण्यासाठी भोईर याने हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. ६ मे २०११ रोजी वारिंगे हे आपल्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी करत असताना दोघांनी त्यांच्यावर गोळीबार करून पळ काढला. या हल्ल्यात वारिंगे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर वारिंगे यांचे कोणासोबत वैर होते, याची चाचपणी करण्यात आली. या तपासात भालचंद्र या तुरुंगात असलेल्या आरोपीवर संशय आला. या प्रकरणात पोलिसांनी तपास करताना महेंद्र केवट आणि दत्तात्रेय गायकवाड या दोघांना अटक केली.
या दोघांनीच वारिंगे यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. भालचंद्र याने तुरुंगात असताना त्याच्यासोबत असलेल्या सुमित येरुणकर याच्यासोबत मैत्री वाढवली. वारिंगे यांना मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तर, सुमितवर महेंद्र आणि दत्तात्रेय यांच्या मदतीने हत्येचा आरोप होता. या मारेकऱ्यांना नितीन ठाणगे आणि संतोष यादव या रिक्षाचालकाने मदत केल्याचा आरोप केला होता.
>सात वर्षांनंतर निकाल
या प्रकरणात नितीन हा जामिनावर सुटलेला असताना अपघातात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा निकाल सात वर्षांनंतर कल्याण न्यायालयाने दिला आहे. वारिंगे यांच्या हत्या प्रकरणात सबळ पुरावा नसल्याने सर्व सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

Web Title: All the accused in the murder of Nitin Waringe are innocent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.