उत्तन येथील सर्व मासेमारी बोटी सुरक्षित; किना-यावरील साहित्यांचे मात्र किरकोळ नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 05:42 PM2017-12-05T17:42:27+5:302017-12-05T19:31:39+5:30
भार्इंदर - पश्चिम समुद्र किनारपट्टीवरील समुद्रात ओखी वादळामुळे जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार उत्तन येथील सर्व मासेमारी बोटी सोमवारी सायंकाळपर्यंत तेथील जेट्टींलगत नांगरण्यात आल्या.
राजू काळे
भार्इंदर - पश्चिम समुद्र किनारपट्टीवरील समुद्रात ओखी वादळामुळे जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार उत्तन येथील सर्व मासेमारी बोटी सोमवारी सायंकाळपर्यंत तेथील जेट्टींलगत नांगरण्यात आल्या. त्यामुळे तूर्तास त्या सुरक्षित असून किना-यावरील मासळी सुकविण्याच्या जागेतील साहित्यांचे मात्र किरकोळ नुकसान झाल्याचे पाली मच्छीमार सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी सांगितले.
बोटींना समुद्रात मच्छीमारीसाठी जाण्यास बंदी घालण्यात आल्याने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सोमवारीच जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनांना सावधनतेचा इशारा दिला होता. त्यानुसार मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी देखील पश्चिम किनारपट्टीवरील शहराच्या हद्दीतील भाटेबंदर ते पाली दरम्यानच्या मच्छिमारांना अतिदक्षतेचा इशारा दिला होता. पालिकेसह जिल्हाप्रशासन व उत्तन-सागरी पोलिसांनी किना-याचा ताबा घेत समुद्रात जाणा-यांना रोखले. दर १५ मिनिटांनी वादळाचा वेध घेत किना-यावरील मच्छीमारांना जागरुक राहण्यासाठी त्याची माहिती दिली जात होती.
दरम्यान सोमवारी सायंकाळपर्यंत किना-यावरील सर्व बोटी किना-यावरील जेट्टींलगत सुरक्षितपणे नांगरण्यात आल्या. मंगळवारी मध्यरात्री समुद्रातील मोठ्या भरतीमुळे पाण्याची पातळी वाढली होती. मात्र त्यात किना-यावरील काही साहित्यांचे किरकोळ नुकसान झाल्याचे डिमेलो यांनी सांगितले. तसेच उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे यांनी सांगितले कि, गेल्या तीन दिवसांपासुन किना-यावरील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देणे सुरु होते. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटी वेळेतच किना-यावर नांगरण्यात आल्या. तरीदेखील पोलिसांची किना-यावर गस्त सुरु असुन वादळाचा आढावा सतत घेतला जात आहे. ओखी वादळामुळे शहरात सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पावसाची रिमझिम सुरु झाली. ती मंगळवारीही कायम होती.