सर्व सामान्य जनतेला घर, परिसर देशा - देशात स्नेह हवा, युद्ध नको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 04:12 PM2019-03-12T16:12:33+5:302019-03-12T16:14:06+5:30
सावित्रीबाई फुले स्मृतिदिनी कुटुंब समता मेळाव्यात महिलांचा हुंकार व्यक्त झाला.
ठाणे : घर, परिसर, शेजार - पाजारी, विविध जाती - धर्मियात आणि देशा - देशात परस्पर स्नेह, सहकार्य आणि समता वाढीस लागो. त्यांच्यात संघर्ष, युद्ध आणि हिंसा वाढू नये; असा शांती, सद् भावना आणि बहीण- भाई चाऱ्याचा हुंकार ठाण्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त आणि जागतिक महिला दिन साजरा करतांना व्यक्त झाला.
या निमित्ताने, समता विचार प्रसारक संस्थेने कुटुंब समता मेळावा कॉ. गोदूताई परुळेकर उद्यानात साजरा केला होता. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यजल्लोष च्या प्रणेत्या प्रतिभा मतकरी म्हणाल्या, " मुलांनी केवळ अभ्यास एके अभ्यास आणि घर एके घर असे ना करता पालकांनी त्यांना खेळ, कला, समाज कार्य आदी उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे. यामुळे मुलांचा मानसिक आणि व्यक्तिमत्व विकास होतो आणि त्यांचा अभ्यासही सुधारतो. भविष्यात हे व्यापक सामाजिक भानच मुलांना समंजस नागरिक बनविण्यास कारणीभूत ठरते". अध्यक्षस्थानी ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ होते. या मेळाव्यास ठाण्यातील विविध लोकवस्त्या - चिराग नगर, माजिवडा, इंदिरा नगर, लोकमान्य नगर, सिद्धार्थ नगर, रमाबाई आंबेडकर नगर, किसन नगर, सावरकर नगर मधील संस्थेशी जोडलेल्या कष्टकरी महिला तसेच मध्यम वर्गीय कुटुंबे, महाविद्यालयीन युवक आणि एकलव्य युवा मोठ्या संख्येने उपस्थित होती. सदर मेळाव्यात स्त्री पुरूष समता - कुटुंब ते समाज, प्रेम हवे वैर नको - कुटुंब ते जाती-धर्म आणि युद्ध नको, शांती हवी - कुटुंब ते राष्ट्र, अशा तिहेरी स्तरावर कार्यक्रम उलगडत नेण्याचे नियोजन केले होते. विविध आर्थिक - सामाजिक स्तरावरील कुटुंबियांच्या मुलाखती, कुटुंबातील आणि परिसरातील वातावरणात स्नेह आणि मैत्री फुलावी यासाठीचे मार्ग आणि सध्याच्या युद्ध उन्मादाच्या काळात शांततेचा पुरस्कार व्यक्त करणाऱ्या छोटेखानी मुलाखती, कथावाचन, ज्योतिबा फुले यांचे अखंड, बुद्धवंदना, समतेची गाणी, नृत्य, जादूचे प्रयोग असे अनेक कार्यक्रम सादर करण्यात आले. नाट्य जल्लोष च्या संयोजक आणि लेखिका - निवेदक हर्षदा बोरकर यांनी या कार्यक्रमाचे अतिशय खुमासदार पद्धतीने सूत्र संचालन केले.
घर काम धुणी भांडी करून, रिक्षा चालवून कुटुंब उभारणाऱ्या कष्टकरी महिलांचा सन्मान!
डॉ. संजय मं. गो. यावेळी म्हणाले, "ठाण्यात लोकवस्तीत राहणाऱ्या कष्टकरी समूहा सोबत माध्यम वर्गीय कुटुंबीयांनी एकत्र येऊन अशा प्रकारे सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक आदान प्रदान करीत राहणे, हि आजच्या काळात महत्वाची घटना आहे. कोण कोणत्या जातीचा, धर्माचा, आर्थिक स्तराचा असा विचार करून आज काल समाज विभागला जात आहे. हीच विषमता, वैर आणि विद्वेष राष्ट्र- राष्ट्रात पसरविण्याचे काम धर्माचा चुकीचा अर्थ लावून केला जातो आहे. सावित्रीबाई फुले यांनी अशी विषमता मनात ना बाळगता मुलींची पहिली शाळा काढली, हाल अपेष्टा सहन केल्या. त्यांचे ऋण मान्य करायचे असेल तर शांती - सद् भावना आणि सहकार्याचा हा हुंकार बुलंद करूया, असे आवाहन त्यांनी केले. या मेळाव्यात सहभागी झालेल्या विविध वस्तीतील घर काम - धुणी भांडी करून वा रिक्षा चालवून मुलांना सुशिक्षित करणाऱ्या आणि कुटुंब उभारणाऱ्या कष्टकरी महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या कामात संपूर्ण कुटुंब सहकार्य करीत असलेल्या जगदीश खैरालिया आणि मनीषा जोशी या दोन कुटुंबांचा प्रतिभा मतकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चिराग नगरच्या बौद्ध विहाराचे आयु. कृष्णा गायकवाड, हिरा साळवे, वसुधा गायकवाड आणि सहकाऱ्यांनी अर्थासहित बुद्ध वंदना सादर केली. लोढा - माजिवडा गृह संकुलातील महिलांनी सैनिक हो तुमच्या साठी आणि माणसाने माणसाशी माणसासम वागणे हि तर रुस्तोमजी गृह संकुलातील महिलांनी करू पाहिलं नमन ज्योतिबाला ही गीते सादर केली. नाट्य जल्लोष चा आदर्श उबाळे याने एकपात्री प्रहसन तर मंजिरी पोखरकर हिने साहित्यिक सोनाली लोहार यांच्या लढाई या कथेचे वाचन सादर केले. दीपक वाडेकर या एकलव्याने कॉ. गोदूताई परुळेकर यांच्या कार्याची ओळख करून दिली. जादूगार रमेश यांनी जादूचे प्रयोग सादर केले. या मेळाव्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राणी आरखडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने, वाल्मिकी विकास संघाचे प्रवीण खैरालिया, ठाणे मतदार जागरण अभियानचे, नुकतेच नोटरी म्हणून नियुक्त झालेले ऍड. जयेश श्रॉफ, नाट्य जल्लोषच्या सविता दळवी, टॅगच्या नीलिमा सबनीस आदी मान्यवर उपस्थित होते. समता विचार प्रसारक संस्थेच्या लतिका सु. मो., हर्षलता कदम आणि अनुजा लोहार यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते तर मनीषा जोशी, सुनील दिवेकर, कल्पना भांडारकर, राहुल सोनार, आतेश शिंदे, ओंकार जंगम, निलेश दंत, दीपक वाडेकर, दर्शन पडवळ, इनॉक कोलियार आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहेनत घेतली.