जालना येथील लाठीचार्जच्या निषेधार्थ उल्हासनगरात सकल मराठा समाजाचा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 04:22 PM2023-09-04T16:22:34+5:302023-09-04T16:22:43+5:30
- सदानंद नाईक उल्हासनगर : जालना येथील लाठीचार्जच्या निषेधार्थ सकल मराठा समाजच्यावतीने शिवाजी चौक ते प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात ...
- सदानंद नाईक
उल्हासनगर : जालना येथील लाठीचार्जच्या निषेधार्थ सकल मराठा समाजच्यावतीने शिवाजी चौक ते प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बांगड्या भेट म्हणून पाठविणार असल्याचे महिलांनी सांगितले.
जालना येथील मराठा उपोषणकर्त्यावर अमानुष लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ शहरातील सकल मराठा समाजातील शेकडो जण दुपारी छत्रपती शिवाजी चौक येथे एकत्र आले. यावेळी सर्वांनी जालना येथील लाठीचार्जचा निषेध करून राज्य सरकारचा धिक्कार केला. तसेच लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बांगड्या पाठविणार असल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांत कार्यालय दरम्यान मराठा समाजाने मोर्चात शेकडो जण सहभागी झाले होते. सुनीता गव्हाणे व ज्ञानेश्वर करवंदे यांच्यासह अन्य जणांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
प्रांत कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर सकल मराठा समाजाने राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. लाठीचार्ज करणाऱ्या व लाठीचार्जचा आदेश देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनद्वारे प्रांत अधिकाऱ्यांना करण्यात आली. शहरातून निघालेल्या सकल मराठा समाजाच्या मोर्चात शेकडो जणांनी सहभाग घेतला. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मोर्चाच्या वेळी सर्वाधिक घोषणा व रोष गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यावर असल्याचे उघड झाले. शांततेच्या मार्गाने चाललेल्या लढ्याला जालना येथील घटनेने गालबोट लागले असून लाठीचार्जचा आदेश देणाऱ्याचे नाव राज्य सरकारने घोषित करण्याची मागणी मोर्चातून झाली. प्रांत कार्यालयाला निवेदन दिल्यावर मोर्चातील शेकडो नागरिक शांततेने घरी गेले.