आगळ्या वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन करत समस्त पुरुष वर्ग होणार वचनबद्ध, महाराष्ट्रभरात राबविणार उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 05:02 PM2018-08-23T17:02:32+5:302018-08-23T17:04:16+5:30
अर्थ फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने ' पुरुषार्थ ' हा उपक्रम ठाणे शहरासह संपूर्ण राज्यातील शाळा , महाविद्यालयात राबवण्यात येणार आहे.
ठाणे : रक्षाबंधन भावा बहिणीच्या अतूट नात्याचा उत्सव. आपल्या भावाला राखी बांधते . या निमित्ताने भाऊ आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो .मात्र हे वचन वैयत्तिक असते . समाजात वावरताना विविध नात्यातील महिला ' पुरुषांच्या ' आयुष्यात येतात . त्यामुळे ' रक्षण ' आणि ' आदर ' केवळ बहीण आणि रक्षाबंधन पुरता मर्यादित न राहता त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक महिलेप्रती तो आदरभाव असावा यासाठी पुरुषांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी अर्थ फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने ' पुरुषार्थ ' हा उपक्रम ठाणे शहरासह संपूर्ण राज्यातील शाळा , महाविद्यालयात राबवण्यात येणार आहे .
या उपक्रमाचा शुभारंभ २७ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी ३ वाजता जोशी - बेडेकर महाविद्यालयाच्या थोरले बाजीराव सभागृह येथे होणार आहे . या उपक्रमाचा शुभारंभ ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर , ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल , आमदार संजय केळकर , आमदार निरंजन डावखरे ,सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विजू माने यांच्या उपस्थित होणार आहे . या निमित्ताने महाविद्यालयाचे ५०० विद्यार्थी खऱ्या अर्थाने वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन करण्यासाठी सज्ज होणार आहेत . हा उपक्रम रक्षाबंधन ते भाऊबीज या कालावधीत संपूर्ण राज्यातील शाळा , महाविद्यालयात आयोजित करण्यात येणार आहे . या निमित्ताने विद्यार्थी ' पुरुषार्थाचा 'अर्थ सांगणारी प्रतिज्ञा घेतील .. तसेच या उपक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील प्रभावशाली पुरुष सहभागी होऊन विद्यार्थ्यांसमवेत ' पुरुषार्थाचा 'अर्थ सांगणारी प्रतिज्ञा घेणार आहेत. उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्षा महिला मोर्चा ऍड . माधवी नाईक यांनी सांगितले , भविष्यात सुदृढ समाज निर्माण व्हावा तसेच महिलांनी स्वसंरक्षण कसे करावे याचे धडे दिले जातात मात्र त्यांचा इच्छांचा आदर करण्याचा संस्कार मुलांवर झाला पाहिजे तर भविष्यात समाजात घडणार्या आळा बसण्यास प्रारंभ होईल त्यासाठी रक्षाबंधन कडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा हा प्रयत्न असल्याचे नमूद केले.