एनसीसी कॅडेट मारहाणीच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांची आंदोलने; जोशी-बेडेकर महाविद्यालयाला छावणीचे स्वरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 12:57 PM2023-08-05T12:57:44+5:302023-08-05T12:58:13+5:30
दिवसभर राजकीय पक्षांकडून आंदोलन सुरू असल्याने त्या महाविद्यालयाच्या गेटला छावणीचे स्वरूप आले होते.
ठाणे : ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या कनिष्ठ विद्यार्थ्यांना शिस्तीच्या नावाखाली वरिष्ठ एनसीसी कॅडेटकडून झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी उमटले. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना, काँग्रेस आणि मनसे अशा सर्व पक्षांनी आंदोलन केले. सकाळपासून एका मागोमाग एक आंदोलन झाले. अमानुष शिक्षा करणाऱ्या शुभम प्रजापतीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. दिवसभर राजकीय पक्षांकडून आंदोलन सुरू असल्याने त्या महाविद्यालयाच्या गेटला छावणीचे स्वरूप आले होते.
शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रसचे ठाणे शहराध्यक्ष वीरू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदवला, तसेच मारहाण करणाऱ्याला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर शिवसेना (शिंदे गट) युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे यांनी या घटनेचा निषेध नोंदवत, महाविद्यालय प्रशासनाने प्रजापतीच्या विरोधात एफआयआर नोंदवावा, अशी मागणी केली. कॉलेजच्या गेटला लॉक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न ठाणे नगर पोलिसांनी हाणून पाडला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कॉलेजसमोर आंदोलन केले.
त्यानंतर मनसेने महाविद्यालयावर धडक देत आंदोलन केले. यावेळी मनसेचे शहरप्रमुख रवी मोरे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. ठाणे शहर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी एन.एस.यु.आय या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत, कॉलेजच्या प्राचार्य सुचित्रा नाईक यांना संबंधितावर गुन्हे दाखल करून कडक कारवाईची मागणी केली.
गुन्हा दाखल करण्याचीही मागणी
युवा-युवतीसेनेचे पदाधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेऊन जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्य सुचित्रा नाईक आणि पोलिस उपायुक्त परिमंडळ १ चे गणेश गावडे यांना पत्राद्वारे संबंधितावर गुन्हे दाखल करून कडक कारवाईची मागणी केली. या प्रकरणाची दखल घेऊन मुंबई युवासेना कोअर कमिटी यांनी सेंट्रल मैदान येथील पोलिस उपायुक्त यांच्या कार्यालयात भेट घेऊन थेट प्राचार्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन दिले.