कळवा, मुंब्रा, दिव्याच्या वीजेच्या खाजगीकरणाच्या विरोधात सर्व पक्षीय नेते एकवटले, दिली बंदची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 03:52 PM2019-01-14T15:52:29+5:302019-01-14T15:56:45+5:30
कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील वीजेच्या खाजगीकरणाच्या विरोधात अखेर सर्व पक्षीय मंडळी एकत्र आली आहे. त्यानुसार या भागाचे खाजगीकरण केले जाणार नाही, असे लेखी आश्वासन शासनाकडून मिळविण्यासाठी त्यांनी आवाज उठविला आहे. परंतु तसे न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.
ठाणे - कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील वीजेचे खाजगीकरण करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यानुसार हे काम टोरेन्ट कंपनीला देण्याचे निश्चित झाले आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत टोरेन्ट कंपनीला कळवा, मुंब्य्रात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा आता सर्व पक्षीय नेत्यांनी दिला आहे. खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी सोमवारी घेण्यात आलेल्या एका बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. टोरेन्टला परवानगी या भागात वीजेचे खाजगीकरण करण्यासाठी परवानगी दिली तर कळवा, मुंब्रा बंदची हाक दिली जाईल असा इशाराही या बैठकीत देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
ठाण्यातील रेस्ट हाऊस येथे घेण्यात आलेल्या या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर, भाजपचे आमदार किसन कथोरे, शिवसेनेचे कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेवक राजन किणे, उमेश पाटील, दशरथ पाटील, प्रकाश बर्डे, बाबाजी पाटील, धर्मराज्य पक्षाचे पदाधीकारी आणि इतर संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कळवा, मुंब्रा भागातील वीज चोरी, गळती रोखण्यासाठी महावितरणने या भागात वीजचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार टोरेन्ट कंपनीला हे काम दिले जाणार आहे. परंतु या खाजगीकरणाच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीपाठोपाठ आता शिवसेनासुध्दा आक्रमक झाली आहे. त्यानुसार या खाजगीकरणाच्या विरोधात सोमवारी ही बैठक घेण्यात आली. आमदार सुभाष भोईर यांनी या कंपनीचा भिवंडीतील अनुभव फार वाईट आहे, त्यामुळे आमचा या खाजगीकरणाला आणि संबधींत कंपनीला विरोध असल्याचे सांगितले. भोईर यांनी या कंपनीला दिलेला लेटर आॅफ इंटरेस्ट तातडीने रद्द करण्याची मागणी ऊर्जामंत्र्यांकडे पत्राव्दारे केली आहे. कळवा, मुंब्य्रातच नाही तर संपूर्ण ठाण्यातील महावितरणच्या ग्राहकांना वाढीव बिले येत आहेत. अचानक वाढलेल्या या बिलांच्या विरोधात राष्ट्रवादीने आक्र मक भूमिका घेत यावर तोडगा काढला गेला नाही तर वागळे इस्टेट भागातील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले जाईल असा इशाराही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता. तर शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र साप्ते यांनी देखील या कंपनीच्या विरोधात ऊर्जामंत्र्यांना पत्र दिले आहे.
दरम्यान या बैठकीत वादग्रस्त कंपनीला पाय ठेऊ देणार नसल्याचा इशारा देत गुरु वार पर्यंत जर शासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारचा निर्णय न आल्यास महावितरणच्या कार्यालयावर लाखोंचा मोर्चा आणला जाईल अशी माहिती ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी दिली आहे. किंवा वेळ पडल्यास कळवा, मुंब्रा, दिवा बंदची हाकही दिली जाईल अशी भुमिका यावेळी घेण्यात आली. मुंब्रा विभागामध्ये अंदाजे ८४ हजार, दिवा व शिळ, देसाई विभागात ५६ हजार आणि कळवा विभागात सुमारे ६० हजार ग्राहक संख्या असून या विभागातील नागरिक खाजगीकरण होणार असल्याने संभ्रमात आहेत. तसेच अचानक खाजगीकरण होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
या संदर्भात आता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व पक्षीय मंडळी भेट घेणार असून त्यांच्या करवी शासनाकडून खाजगीकरणाच्या विरोधातील लेखी आश्वासन मागितले जाणार आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे या बाबत काय भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.