स्मार्ट सिटीबाबत सर्वपक्षीयांचे मौन
By admin | Published: January 30, 2016 02:24 AM2016-01-30T02:24:47+5:302016-01-30T02:24:47+5:30
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीतून ठाणे शहर बाद झाल्याने ठाणेकरांची घोर निराशा झाली आहे. असे असताना या मुद्यावरून स्थायी समितीत विरोधक
ठाणे : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीतून ठाणे शहर बाद झाल्याने ठाणेकरांची घोर निराशा झाली आहे. असे असताना या मुद्यावरून स्थायी समितीत विरोधक सत्ताधारी आणि प्रशासनाला जाब विचारतील, अशी अपेक्षा असताना त्यांनी मात्र मौन बाळगले. स्मार्ट सिटीला का वगळले, असा सवालही कोणी उपस्थित न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वांनीच आपल्या प्रभागातील प्रस्ताव मंजूर करण्यावर भर दिल्याचे या बैठकीत दिसून आले.
दोन महिन्यांपूर्वी पालिकेने विविध पद्धतींचा अवलंब करून ठाणेकरांच्या नजरेतून स्मार्ट सिटीचा ६६३० कोटींचा जम्बो आराखडा तयार केला होता. यामध्ये ७५० एकरांचा विकास करण्याचे स्वप्नही पालिकेने दाखविले. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीतून ठाण्याला वगळल्याने पालिका प्रशासनही अचंबित झाले आहे. परंतु, एप्रिल महिन्यात जाहीर होणाऱ्या दुसऱ्या यादीत ठाण्याचा नंबर लागेल, असा ठाम विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे ठाण्याला वगळण्यामागे पुढील वर्षी होणारी मनपा निवडणूक कारणीभूत ठरली असून निवडणुकीच्या तोंडावर ठाण्याची निवड होणार असल्याचे उघड झाले आहे. तरीही एकाही सदस्याने साधा स्मार्ट सिटी हा उल्लेख करणेसुद्धा टाळले.
बैठकीत दिसले खेदजनक चित्र
विशेष म्हणजे स्मार्ट सिटीचा आराखडा तयार करण्यासाठी झालेला खर्च, जनजागृती आणि ज्या संस्थेला हे काम दिले होते, त्यांचा झालेला खर्च यासंदर्भातील लाखो रुपयांचे प्रस्ताव स्थायीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर होते. परंतु, ठाण्याची निवड झालीच नाही, तर याला मंजुरी का द्यायची, असा सवाल उपस्थित करून विरोधक प्रशासनाचे हे प्रस्ताव रोखून धरतील, असेही वाटत होते. परंतु, त्यांनी तलवारच म्यान केल्याने स्मार्ट सिटी होवो ना होवो, आपल्या प्रभागातील प्रस्ताव मंजूर करण्यात सर्वपक्षीय सदस्यांनी धन्यता मानल्याचे खेदजनक चित्र स्थायी समितीत दिसले.