डोंबिवली कोविड वॉररूम सुरू करण्यासाठी सर्वपक्षीय पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:38 AM2021-04-13T04:38:33+5:302021-04-13T04:38:33+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांना कोरोनाचे उपचार मिळणे सोयीचे व्हावे, यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांना कोरोनाचे उपचार मिळणे सोयीचे व्हावे, यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन पुढाकार घेतला आहे. डोंबिवली पश्चिमेत कोविड वॉररूम सुरू करण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी साेमवारी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी वॉररूम सुरू करण्यास होकार दर्शविला आहे. लवकरच डोंबिवलीत ही वॉररूम सुरू केली जाणार आहे.
शिवसेनेचे सदानंद थरवळ, भाजपचे नंदू परब, काँग्रेसचे नंदू म्हात्रे, जितेंद्र भोईर, हृदनाथ भोईर, मनसेचे प्रकाश माने यांच्या शिष्टमंडळाने साेमवारी महापालिका आयुक्त सूर्यवंशी यांची भेट घेतली. महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बेड, इंजेक्शन, प्लाझ्मा यासाठी नातेवाइकांची तारांबळ उडत आहे. त्यासाठी डोंबिवलीत वॉररूम सुरू करण्याची मागणी केली आहे. डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रोडवरील मथुरा निवास येथे ही वॉररूम सुरू करण्यात येणार आहे. याठिकाणी महापालिकेचा अधिकारी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत उपस्थित राहील. रुग्णांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, इंजेक्शन नेमके कुठे व केव्हा उपलब्ध होईल, याची माहिती याठिकाणाहून दिली जाईल. त्यासाठी एक मेडिकल स्टोअर निश्चित करून ते २४ तास सुरू राहील, हे पाहावे. महापालिकेची १० प्रभाग क्षेत्रे आहेत. प्रत्येक प्रभाग क्षेत्रात प्रत्येकी पाच लसीकरण केंद्रे सुरू करण्यात यावीत. रुग्णांची नाव-पत्त्यासह यादी प्रसिद्ध करण्यात यावी. रुग्णांना भरमसाट बिल आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांविराेधात कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
फॅमिली डाॅक्टरांमध्ये जनजागृती आवश्यक
महापालिका आयुक्त म्हणाले की, महापालिकेचीही वॉररूम आहे. मात्र, वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता संबंधितांनी वॉररूम सुरू करण्यासाठी घेतलेला पुढाकार सकारात्मक आहे. महापालिकेस त्यामुळे मदत होणार आहे. त्यामुळे ही वॉररूम सुरू करण्यास अनुमती दिली जाणार आहे. त्याचबरोबर सर्वपक्षीय सदस्यांनी जास्तीतजास्त सामाजिक संस्थांशी जोडून घेत क्वारंटाइन सेंटरसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास त्याठिकाणी सेंटर सुरू करता येईल. काही फॅमिली डॉक्टर हे रुग्णाला लक्षणे दिसत असताना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला न देता उपचार करीत बसतात. त्यासाठी अशा डॉक्टरांमध्ये जनजागृती करावी.
फोटो-कल्याण-आयुक्त भेट
---------------------