जिल्ह्यात दहावी-बारावीचे वर्ग वगळता सर्व शाळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:01 AM2021-02-23T05:01:06+5:302021-02-23T05:01:06+5:30
ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सध्या सुरू आहेत. मात्र, आता दहावी व बारावीचे ...
ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सध्या सुरू आहेत. मात्र, आता दहावी व बारावीचे वर्ग वगळता अन्य सर्व वर्गांच्या शाळा मंगळवारपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवून संबंधित यंत्रणांनी ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू ठेवण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनास सोमवारी दिले.
सोमवारी संध्याकाळी त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासोबत कोरोना आढावा बैठक घेतली.
आठवड्यानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येच्या परिस्थितीचे अवलोकन करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. तूर्तास जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येणार नाही, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सध्या रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे त्यास आळा घालण्यासाठी मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळावा, असे ते म्हणाले.
जिल्ह्यातील रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे, ही परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सूक्ष्म नियोजन करा. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे, ते क्षेत्र कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करा. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबवा. संपर्क शोधमोहीम (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) अधिक प्रभावीपणे राबवा, असेही निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले.
हॉटेल, उपाहार गृहे, मंगल कार्यालये, मॉल तसेच रिसोर्ट येथे आयोजित करण्यात येणारे समारंभ आदी शासनाच्या नियमांचे पालन करून आयोजित करावेत. मर्यादेपेक्षा जास्त संख्या आढळून आल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाईचे निर्देश पोलीस प्रशासनास दिले. पोलिसांनी सरप्राइज चेक करावे तसेच सामाजिक अंतराचे नियम न पाळणऱ्यांवर थेट कारवाई करावी.
..तर परवाना होणार रद्द
ज्या आस्थापना, संस्था, कार्यालये शासनाच्या नियमांचे उल्लंघन करतील त्यांचा परवाना रद्द करणे, अथवा सदर ठिकाण सील करण्याबरोबरच दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितले.