जिल्ह्यात सर्व शिवभोजन केंद्रांवर दररोज १५ जणांच्या नशिबी थाळी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:33 AM2021-07-25T04:33:23+5:302021-07-25T04:33:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटपासून मजूर, गोरगरीब यासारख्या गरजूंना राज्य शासनाने ''शिवभोजन'' ही जेवणाची थाळी मोफत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटपासून मजूर, गोरगरीब यासारख्या गरजूंना राज्य शासनाने ''शिवभोजन'' ही जेवणाची थाळी मोफत उपलब्ध करून दिली आहे. या भोजनावर दिवसाला जिल्ह्यातील हजारो लोकांचा उदरनिर्वाह सध्या सुरू आहे. या केंद्रावर निश्चित वेळेवर लाभार्थ्यांची गर्दी पाहण्यालायक असते. मात्र, गर्दीमुळेच जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या केंद्रांवरील जेवण संपल्यामुळे प्रत्येक केंद्रांवरून दररोज १५ ते २० जणांना, तर काही वेळेस ५० जणांना जेवण मिळत नाही. ते उशिरा येत असल्याने त्यांना नाइलाजास्तव रिकाम्या हाती परत जावे लागत असल्याचे वास्तव उघकीस आले आहे.
जिल्ह्यातील शहरी भागात ३७ शिवभोजन केंद्र सुरू आहेत. कोरोना प्रतिबंधात्मकच्या तिसऱ्या स्तरात जिल्ह्यातील जनजीवन वावरत आहे. गरजू, गोरगरीब लक्षात घेऊन या केंद्रांना जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. या केंद्रांना दुसऱ्या लाटेच्या प्रारंभापासून दीडपट थाळी वाटपाची मान्यता मिळालेली आहे. या मोफत थाळ्यांचा लाभ गरजूंना होत आहे. या मोफत थाळीवाटपाची मुदतही गेल्या काही दिवसांपासून संपलेली आहे. पण पुढील आदेश येईपर्यंत ही भोजन थाळी केंद्रचालक मोफत वाटप करीत असल्याचे वास्तव निदर्शनात आले आहे. परंतु, लाभार्थींची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे २०० ते ३०० थाळ्या चुटकी सरशी संपत आहेत. काही लाभार्थी वेळेवर येत नाही. उशिरा आलेल्यांना मात्र या थाळीचा लाभ मिळत नाही.
गरजूंना हक्काची जेवणाची थाळी
या शिवभोजन केंद्रांवर या संचार बंदीच्या कालावधीतही गरजूंना मोफत थाळी मिळत आहे. आता थाळींची संख्याही बहुतांशी ठिकाणी ५० ते १०० ने वाढवली आहे. काही ठिकाणी २०० ते ३०० थाळ्या मोफत वाटप होत आहे. या आधी गरजूंना केवळ पाच रुपयांमध्ये शिवभोजन दिले जात असे. पण आता पैसे घेतले जात नाहीत. जेवण तयार होण्याआधीच गरजूंच्या केंद्रांवर फेऱ्या सुरू होतात. पण आता त्यांना पार्सल द्यावी लागत असल्यामुळे त्यांना केद्रांवर गर्दी करू दिली जात नाही. या पार्सलसाठी लागणाऱ्या पॅकिंगचे डबेदेखील केंद्रांवर दिले जात आहे. केंद्रांवर लाभार्थी संख्या वाढल्याने जेवण लवकर संपत आहे.
---------