रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्तीची काम करा; महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश

By अजित मांडके | Published: July 10, 2024 03:06 PM2024-07-10T15:06:12+5:302024-07-10T15:06:35+5:30

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश

All systems should work on the triad of clarity on road ownership, pooling of resources and road repair in the shortest possible time. | रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्तीची काम करा; महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश

रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्तीची काम करा; महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश

ठाणे : पावसाळ्यात रस्ते खराब होऊन त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करताना कमीत कमी वेळेत प्रतिसाद दिला गेला पाहिजे. त्यासाठी महापालिकेसह सर्व यंत्रणांनी एक टीम बनून काम करावे. संसाधने, मनुष्यबळ, रस्त्याची मालकी, कामाची जबाबदारी यापैकी कोणतीही अडचण त्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, संसाधनांचे एकत्रीकरण आणि कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्ती या त्रिसूत्रीने आपण सगळ्यांनी एकत्रित काम करून आपले क्षेत्र खड्डेमुक्त करूया, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे.

पावसाळ्यातील रस्ते स्थितीचा, विशेषत:  घोडबंदर रोडचा, आढावा घेण्यासाठी बुधवारी सकाळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात सर्व यंत्रणांच्या विभागप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत, ठाणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता विनय सुर्वे, कार्यकारी अभियंता गुरुदास राठोड, मेट्रोचे समन्वयक जयंत डहाणे, कायर्कारी अभियंता सुरेंद्र शेवाळे आणि अतुल पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.

आनंद नगर चेक नाका ते गायमुख या पट्ट्यातील पूर्व द्रुतगती महामार्ग आणि घोडबंदर रोड यावरील रस्त्याचे कोणते भाग कोणाकडे आहेत, तसेच, त्यावरील कोणत्या मार्गिकेत कोणाचे काम सुरू आहे, उड्डाणपूलांची जबाबदारी कोणाची आहे या विषयीची स्पष्टता येण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र बसून नकाशावर त्याचे रेखांकन करावे. त्यातून रस्त्याविषयी स्पष्टता येईल आणि संदिग्ध स्थिती होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर, पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी सर्व यंत्रणांची संसाधने, मनुष्यबळ हे एकाच यंत्रणेचा भाग आहेत. त्यामुळे एकमेकांना सहाय्य करून रस्ता कमीत कमी वेळात दुरुस्त करणे हेच आपले मुख्य उद्दीष्ट आहे. याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या बैठकीत, घोडबंदर सेवा रस्ता कामातील अडचणी, भाईंदरपाडा येथील मलनि:सारण वाहिनीचे काम, नागला बंदर परिसरातील मेट्रोच्या कामामुळे आवश्यक असलेली रस्ते दुरुस्ती आणि आनंद नगर चेक नाका येथील रस्त्याची स्थिती आणि त्यावरील तांत्रिक उपाययोजना याबद्दल चर्चा झाली.

Web Title: All systems should work on the triad of clarity on road ownership, pooling of resources and road repair in the shortest possible time.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.