गणपती आगमनासह विसर्जनासाठी तिघांनाच परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:32+5:302021-07-15T04:27:32+5:30
ठाणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा व्हावा, गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंगचे ...
ठाणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा व्हावा, गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जावे या अनुषगांने ठाणे महापालिकेने गणपती उत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात आगमन आणि विसर्जनासाठी जास्तीतजास्त तीन व्यक्ती असाव्यात, मंडपाची उंची १२ फुटांपेक्षा जास्त असू नये या बंधनांसह गणपती विसर्जनासाठी शहरात १३ कृत्रिम तलाव, ७ खाडी घाट, २० मूर्ती स्वीकृती व ‘डीजी ठाणे’अंतर्गत गणपती विसर्जनासाठी टाइम स्टॉल बुकिंगची सोय केली आहे.
येत्या सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात गणेशोत्सव आला आहे. त्या अनुषंगाने आता लगबग सुरू झाली आहे. परंतु, अद्यापही कोरोना कमी झाला नसल्याने त्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. राज्य शासनानेदेखील गणेशोत्सवाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानंतर आता बुधवारी ठाणे महापालिकेनेदेखील तशाच स्वरूपाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपालगत विक्रीचा स्टॉल लावता येणार नाही. मंडपाची उंची १२ फुटांपेक्षा जास्त असू नये, विसर्जनाच्या तारखेस घरगुती गणपती असलेली इमारत प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर विसर्जनासाठी गणेशमूर्ती बाहेर घेऊन जाण्यास परवानगी असणार नाही अशा काही महत्त्वाच्या सूचना यात नमूद केल्या आहेत.
हे आहेत कृत्रिम तलाव - १३
मासुंदा तलाव, खारेगाव, रेवाळे पायलादेवी मंदिर, नीलकंट हाईट्स, उपवन तलाव, रायलादेवी तलाव नं. १, रायलादेवी तलाव नं. २, घोसाळे, खिडकाळी, कोलशेत विभाग, ब्रह्मांड, दातीवली तलाव, न्यू शिवाजीनगर आदी तलावांचा समावेश आहे.
घाट संख्या - ७
कोपरी, कळवा पूल (ठाणे बाजू - चंदणी कोळीवाडा), कळवा पूल (कळवा बाजू - निसर्ग उद्यान), बाळकूम घाट, पारसिक रेतीबंदर, कोलशेत, दिवा घाट
मूर्ती स्वीकृती केंद्र - २०
मासुंदा तलाव, मढवी हाउस / राम मारुती रोड, जेल तलाव, चिरंजीवी हॉस्पिटल, मॉडेला चेकनाका, देवदयानगर, कोपरी प्रभाग कार्यालय, पवारनगर जंक्शन / वसंत विहार शाळा, सर्कल/ऑडिटोरीयम, किसननगर बसस्टॉप, शिवाजीनगर, यशोधननगर चौक/ लोकमान्यनगर बसस्टॉप रोड नं. २२, ट्रॉपिकल लगूनसमोर आनंदनगर, लोढा लक्झेरिया, मनीषानगर, भारत गिअर्स, शीळ प्रभाग कार्यालय, जिव्हाळा हॉल दिवा या ठिकाणी व्यवस्था केली आहे.