ठाण्यातील वर्तकनगरचे तिघेही पोलीस झाले कोरोनामुक्त: ठाणे मुख्यालयाच्या एकाला झाली लागण
By जितेंद्र कालेकर | Published: April 30, 2020 12:43 AM2020-04-30T00:43:10+5:302020-04-30T00:47:52+5:30
ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची बाब मंगळवारी समोर आली. त्याचवेळी वर्तकनगर पोलीस ठाण्यातील कोरोनामुक्त झालेल्या एका पोलीस कर्मचा-याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तर अन्य दोघांचीही चाचणी निगेटीव्ह आल्याने वर्तकनगर पोलिसांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वर्तकनगर पोलीस ठाण्याचे तिन्ही पोलिसांची कोरोना चाचणी ही निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे या तिघांनाही लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. आतापर्यंत ठाणे शहर आयुक्तालयातील चार अधिकारी आणि चार कर्मचारी अशा आठ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या २४ अधिकारी आणि १०३ कर्मचारी अशा १२७ पोलिसांना विलगीकरणात ठेवले आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणातील सहा पैकी दोन आरोपींना कोरोनाची लागण झाली होती. याच आरोपींच्या संपर्कातील वर्तकनगरच्या २२ कर्मचाºयांची सुरुवातीला कोरोनाची तपासणी झाली. त्यात तीन कर्मचाºयांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या तिघांनाही तातडीने ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मंगळवारी यातील एकाची चाचणी निगेटीव्ह आली. तर बुधवारीदोघांचीही चाचणी निगेटीव्ह आली. दरम्यान, या तिघांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या एकाच पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह ९५ कर्मचाºयांची तपासणी करण्यात आली. त्याचवेळी वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांचीही तपासणी झाली. या सर्वांची चाचणी निगेटीव्ह आली होती. या ९५ कर्मचाºयांमध्ये केवळ तीन कर्मचारी वगळता ९२ जणांचे अहवालही निगेटीव्ह आले. तर उर्वरित तिघांनीही आता कोरोनावर मात केल्यामुळे वर्तकनगर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. बुधवारी रात्री उशिरा सफायर रुग्णालयातून वर्तकनगरच्या एका कर्मचाºयाला कळवा येथील सफायर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यावेळी वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ, वर्तकनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच ते वास्तव्यास असलेल्या नवीन पोलीस वसाहतीमधील पोलीस कुटूंबीयांनीही त्यांचे टाळया वाजवून पुष्पवृष्टी करीत त्यांचे स्वागत केले.
* दरम्यान, ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील आणखी एकाला मंगळवारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे मुख्यालयातील कोरोनाबाधितांची संख्या सातवर पोहचली आहे. तर ठाणे शहर आयुक्तालयात २३ पैकी चार कर्मचारी आणि चार अधिकारी असे आठजण कोरोनामुक्त झाल्यामुळे ही संख्या १५ झाली.
* कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील २४ अधिकारी आणि ९४ कर्मचाºयांना होम कॉरंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे. तर नऊ कर्मचाºयांना केंद्रात कॉरंटाईन ठेवले आहे. यामध्ये वर्तकनगरचे तीन अधिकारी आणि २८ कर्मचारी, मुंब्रा येथील सहा अधिकारी ३८ कर्मचारी तर मुख्यालयातील २४ कर्मचाºयांचा समावेश आहे.