मीरा-भाईंदरमधील सर्व गाड्यांचे पासिंग आता मीरा-भाईंदरमध्येच होणार; जागाही झाली निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2022 04:13 PM2022-04-26T16:13:07+5:302022-04-26T19:38:07+5:30
१ मे रोजी सकाळी १० वा. होणार आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन
आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी गेल्या वर्षी मीरा भाईंदर शहरात आरटीओ उपकेंद्र म्हणजेच वाहन चालक परवाना मिळण्यासाठी शिबीर कार्यालय मीरा रोड येथे सुरु करण्यात आले होते. त्यामुळे शहरातील नागरिकांची सोय झाली व त्यांचा वेळ-पैसा याची बचत झाली आहे. मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील वाढती वाहन संख्या व लोकसंख्या विचारात घेता याठिकाणी कायमस्वरूपी वाहन चालक परवाना तसेच मीरा भाईंदर शहरातील वाहनांचे पासिंग शहरातच व्हावे, अशी मागणी विविध संस्था व नागरिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे करीत होते.
मीरा भाईंदर शहरातील नागरिकांच्या मागणीवरून नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मीरा भाईंदरमधील गाड्यांच्या पासिंग संदर्भात आर.टी.ओ.च्या अधिकाऱ्यांसह एका बैठकीचे आयोजन करण्याची विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन विधानभवनामध्ये बैठक झाली होती व त्यात मीरा भाईंदरच्या टेस्टिंग ट्रॅकबद्दल चर्चा करून परिवहन मंत्र्यांनी कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या.
मीरा भाईंदर शहरातील वाहनांच्या पासिंगकरिता भाईंदर पश्चिमे येथे असलेली महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळाची जागा परिवहन विभागास मिळू शकते का ? याबाबत प्रस्तावावर विचार करावा व सर्व संबंधितांची बैठक बोलवावी असे,अनिल परब यांनी सांगितले होते. मात्र जागा उपलब्ध करणे व तेथे कायमस्वरूपी केंद्र करणे यासाठी काही कालावधी लागू शकतो. तोपर्यंतच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात सध्या घोडबंदर येथे आरटीओ उपकेंद्र म्हणजेच शिबीर कार्यालय सुरु आहे त्याच्या समोरील वापरात नसलेल्या रस्त्याची एक बाजू (किमान २५० मी. लांबी) वाहनाच्या फिटनेस तपासणीसाठी मीरा भाईंदर महापालिकेने आरटीओला उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून मीरा भाईंदरच्या नागरिकांना कल्याण (नांदिवली) येथे वाहनांच्या पासिंगसाठी जाण्याची गरज पडणार नाही व त्यामुळे रस्त्यावरची रहदारीही कमी होणार आहे, असे राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मनपा आयुक्त दिलीप ढोले यांना पत्र देऊन कळवले होते.
मीरा भाईंदर शहरातील वाहनांच्या पासिंगसाठी शहरातच टेस्टिंग ट्रॅकसाठी पालिकेने तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती आमदार सरनाईक यांनीही आयुक्तांना केली. त्याची दखल घेऊन मीरा भाईंदर महापालिकेने जागा देण्याचा निर्णय तात्काळ घेतला आहे. त्यानुसार परिवहन अनिल परब यांनी विषय निकाली काढला.
आज दि. २६ एप्रिल, २०२२ रोजी आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर प्रादेशिक उप केंद्राचे उप अधिकारी शेळके साहेब यांचे सह नियोजित जागेची आज पाहणी केली. ही जागा उपलब्ध झाल्याने तेथे 'ड्रायविंग टेस्टिंग ट्रॅक' सुरु होणार असून १ मे पासून मीरा भाईंदर शहरात असलेल्या आर.टी.ओ. उपकेंद्राच्या माध्यमातून टू व्हिलर, थ्री व्हिलर व फोर व्हिलर गाड्यांच्या पासिंगची सुविधा सुरु होणार असून त्यासाठी मीरा भाईंदरच्या नागरिकांना दूरवर जाण्याचा त्रास त्यामुळे वाचणार आहे. तसेच भविष्यात ट्रक व ट्रेलरची देखील पासिंग होऊ शकेल, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. त्याबद्दल आमदार सरनाईक यांनी परिवहन अनिल परब व ठाकरे सरकारचे आभार मानले.