सर्वजण महायुतीचा धर्म पाळतील, नरेश म्हस्के यांचा विश्वास
By अजित मांडके | Published: May 2, 2024 04:53 PM2024-05-02T16:53:09+5:302024-05-02T16:53:42+5:30
गुरुवारी नवी मुंबईत नाईक यांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असतांना त्याचे पडसाद उमटत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. परंतु सर्वच जण महायुतीचा धर्म पाळतील असा विश्वास म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.
ठाणे : कार्यकर्ते हे साहजिकच संजीव नाईक यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. आपल्या नेत्याला उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे त्यांना वाईट वाटणारच. परंतु ही महायुती असल्याने ही परिस्थिती निवळेल आणि सर्वजण एकत्र कामाला लागतील आणि महायुतीचा धर्म पाळला जाईल असा विश्वास ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.
गुरुवारी नवी मुंबईत नाईक यांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असतांना त्याचे पडसाद उमटत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. परंतु सर्वच जण महायुतीचा धर्म पाळतील असा विश्वास म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. म्हस्के हे गुरुवारी सकाळी गणेश नाईक यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या समवेत आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले आदी नेते मंडळी उपस्थित होते.
आपण नाईक यांचा आर्शिवाद घेण्यासाठी गेलो होतो, त्यांच्यासह संदीप नाईक, सागर यांनाही भेटलो असल्याचे म्हस्के म्हणाले. मात्र कार्यकर्त्यांशी कुठल्याही भेटागाठी झालेल्या नाहीत. कार्यकर्त्यांची कुठे बैठक झाली याची माहिती नसल्याचेही ते म्हणाले. मी लहाणपणापासून नाईक यांना भेटत होतो. त्यावेळी देखील ते कौतुक करीत होते. आजही गणेश नाईक यांनी मला आर्शिवाद दिला आहे. काही चिंता करायची गरज नाही, नवी मुंबईतून लीड मिळेल, सर्व काही मी पाहीन काही अडचण असेल तर मला सांग अशा पध्दतीने त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली असल्याचेही त्यांनी सांगितले.
मी साधारण, रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. लोकांमधला कार्यकर्ता आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिलेली आहे. त्या संधीचे मी सोने करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांना शक्ती प्रदर्शनाच्या मुद्यावर छेडले असता, आम्हाला शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही, जी आमची शक्ती आहे, ती या ठिकाणी दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.