आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा छळ व पालकांची लूट करत असल्याचा आरोप
By धीरज परब | Published: June 12, 2023 08:25 PM2023-06-12T20:25:03+5:302023-06-12T20:25:14+5:30
शिक्षण अधिकाऱ्यां समोर आंदोलकांचा ठिय्या
मीरारोड - आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देत छळ केला जातोय व पालकां कडून बेकायदेशीरपणे बळजबरी शुल्क वसुली केली जात असल्याचा आरोप एका खाजगी शाळेबाबत करत पालकांसह मनसे कार्यकर्त्यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्या समोर ठिय्या आंदोलन केले . तक्रारी करून देखील महापालिका कार्यवाही करत नसल्याचा संताप पालकांनी व्यक्त केला .
सोमवारी भाईंदरच्या नगरभवन मधील शिक्षण विभागाच्या कार्यालयात पालकांसह मनसेचे सचिन पोपळे , रॉबर्ट डिसोझा आदींनी ठिय्या आंदोलन केले . शिक्षण अधिकारी सोनाली मातेकर यांच्या कडे तक्रारी आरोपांच्या फैरी पालक व मनसेने झाडल्या .
आरटीई अंतर्गत १ हिली ते ५ वी इयत्तेत प्रवेश घेतलेल्या मुलांना पाठ्यपुस्तक, गणवेश व इतर शालेय साहित्य मोफत न देता विकत घेण्याची सक्ती मीरारोडच्या यू. एस. ओस्तवाल इंग्लिश अकॅडमी शाळेने चालवली आहे . शैक्षणिक शुल्क न भरल्याने वर्गात बसू न देता इतर विद्याथ्यांपेक्षा वेगळी दुय्यम दर्जाची वागणूक देऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान व मानसिक छळ करून बालमनावर दुष्परिणाम केला जात असल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी पोपळे तसेच राजेश जाधव आदी पालकांनी केला .
यावेळी शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली . या आधी देखील पालकांनी सातत्याने तक्रारी केल्या असून पालिकेच्या आधीच्या अधिकाऱ्यांनी शाळेला पत्र देखील दिली होती असे जाधव यांनी सांगितले . तर चौकशी करून योग्य ती कार्यवाही करणार असे आश्वासन शिक्षणाधिकारी मातेकर यांनी दिल्या नंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले .