उत्तनच्या डम्पिंगलासारखी आग लागण्यामागे ठेकेदार व अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संगनमत असल्याचा आरोप
By धीरज परब | Published: April 4, 2024 06:27 PM2024-04-04T18:27:14+5:302024-04-04T18:28:06+5:30
मीरा भाईंदर महापालिकेला शासना कडून उत्तन धावगि येथे घनकचरा प्रकल्प राबवण्यासाठी मोफत जागा मिळाली असताना पालिकेने येथे बेकायदा डम्पिंग ग्राउंडच तयार केले आहे.
मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील डम्पिंगला सातत्याने आगी लागण्या मागे विविध कामांच्या ठेकेदारांचे व अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संगनमत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे उत्तन पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचा तपास काटेकोर झाल्यास अनेक घोटाळे बाहेर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मीरा भाईंदर महापालिकेला शासना कडून उत्तन धावगि येथे घनकचरा प्रकल्प राबवण्यासाठी मोफत जागा मिळाली असताना पालिकेने येथे बेकायदा डम्पिंग ग्राउंडच तयार केले आहे. या ठिकाणी पूर्वीपासून प्रक्रिया न केलेला कचऱ्याचा डोंगर निर्माण झाला आहे. त्याठिकाणी रोजचा येणारा शहरातला सुमारे ४५० ते ५५० टन ओला आणि सुका कचरा वर प्रक्रिया करण्यासाठी एन्वायरो प्रोजेक्ट हा ठेकेदार पालिकेने नेमला आहे. सदर ठेकेदार हा सर्वच कचऱ्यावर प्रक्रिया करत नाही तर काही प्रमाणातील कचऱ्यावरच प्रक्रिया करतोय. शिवाय रोज येणारा कचरापैकी सुमारे ५० टक्के कचरा वर्गीकरण केलेला नसल्याने त्यावर प्रक्रिया करणे अवघड होऊन तेथे रोज कचऱ्याचा डोंगर वाढीला लागलेला आहे.
पूर्वीच्या सुमारे १० लाख टन इतक्या साचलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग करायचे म्हणून पालिकेने कोट्यवधींचा ठेका ठेकेदारास दिला आहे. तर रोजचा येणाऱ्या कचरा सपाटीकरण करण्यासाठीचा वेगळा ठेका गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठेकेदारास आंदण असल्यागत आहे. तर आग लागली की काही गावातील ग्रामस्थच पाणी टँकरने पुरवण्याचे काम करत आहेत.
उत्तन डम्पिंगला सतत आग लागून विषारी धूर पसरून तसेच रोजची दुर्गंधी यामुळे लोकांना श्वास घेणे अवघड झाले आहे. नुकत्याच लागलेल्या आगीमुळे परिसरात ऐन धार्मिक उत्सव काळात परिसरात धुराचे साम्राज्य पसरले. त्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त करत शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देत डम्पिंग बंद करण्याची मागणी केली .
दरम्यान आग लावण्यात आल्याच्या पालिकेच्या फिर्यादी नंतर उत्तन सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास पोलीस करत असतानाच कचऱ्याला आग लावण्यामागे पालिकेचे ठेकेदार व अधिकारी यांच्यातील संगनमत तर कारणीभूत नाही ना? असा प्रश्न केला जात आहे. कारण धावगी येथे कचरा साठवण्यास जागा नसल्याने तसेच रोज येणाऱ्या कचऱ्यासाठी जागा करायची असल्याने लेव्हलिंगचा ठेकेदार काम करतो. तर साचलेल्या कचऱ्याचा डोंगर वर बायोमायनिंग चा ठेकेदार सुद्धा काम करतो. त्यामुळे कचऱ्याला आग लागल्याने ती दोन चार दिवस धुमसत राहून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा हा जाळून गेला आहे. कचरा जळून गेल्याने ठेकेदारांनी त्याचा फायदा होत असल्याचे आरोप होत आहेत. शिवाय आग लागल्यावर टँकरने पाणी पुरवणारे स्थानिक ठेकेदार यांचा सुद्धा आर्थिक फायदा होत असतो.
त्यामुळे आतापर्यंत आग डम्पिंगला मिथेन आदी वायूमुळे आग लागते असा दावा पालिका करत आली होती. परंतु आयुक्तांच्या आदेशाने आग लावण्यात आल्याचा गुन्हा दाखल झाल्याने आता या ठिकाणी संबंधित विविध ठेकेदार आणि पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने आगी लावण्यामागे यांचे संगनमत असल्याचा आरोप पुन्हा स्थानिकांनी चालवला आहे. तर आग रोखण्यासाठी पालिकेने या ठिकाणी पुन्हा सीसीटीव्ही बसवणे, सुरक्षा रक्षक नेमणे पासून विविध उपाय योजना केल्या जात असल्याचा दावा केला आहे .