सहायक आयुक्त घोंगे यांची बदली राजकीय दबावातून केल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:43 AM2021-08-27T04:43:50+5:302021-08-27T04:43:50+5:30
ठाणे : महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांची बदली राजकीय दबावातूनच केल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक ...
ठाणे : महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांची बदली राजकीय दबावातूनच केल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी केला आहे. अनधिकृत बांधकामांच्या पाठिशी राहणाऱ्या काही विशिष्ट नेत्यांच्या प्रभावाखाली आयुक्तांकडून राजकीय अजेंडा राबविला जात असल्याची टीकादेखील त्यांनी गुरुवारी केली.
अनधिकृत बांधकामांच्या मुद्यावरून पालिकेवर टीका झाल्यानंतर आयुक्तांनी सहायक आयुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर घोंगे यांची कळवा प्रभाग समितीत बदली झाली होती. घोंगे यांनी एका महिन्याच्या कालावधीत येथील अनधिकृत बांधकामांवर जोरदार कारवाई सुरू केली होती. त्यातून हितसंबंध दुखावलेल्या नेत्यांच्या दबावामुळे घोंगे यांची अवघ्या महिनाभरातच बदली केल्याचा दावा त्यांनी केला आहे. सहायक आयुक्तपदावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला किमान दोन वर्षांचा कार्यकाळ दिला जातो. मात्र, आयुक्तांनी राजकीय दबावापोटी घोंगेंची बदली केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
महापालिकेच्या परिमंडळ २ च्या उपायुक्तपदाचा कार्यभार सहायक आयुक्त शंकर पाटोळे यांच्याकडे आहे. नौपाडा प्रभाग समितीचे सहायक आयुक्तपदी त्यांच्याकडेच आहे. नौपाडा परिसरातील नागरिकांना ते कधीही कार्यालयात भेटत नाहीत. या दोन पदांबरोबरच आता कळवा येथील सहायक आयुक्तपदाचा कार्यभारही त्यांच्यावर सोपविला गेला. एकाच अधिकाऱ्याकडे तीन पदांचा कार्यभार कशासाठी, असा सवालही त्यांनी केला आहे.