मेट्रोवरून भाजपामध्येच संभ्रम, मुख्यमंत्र्यांनी नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:33 AM2018-04-09T02:33:31+5:302018-04-09T02:33:31+5:30

मीरा-भार्इंदर मेट्रोचा मार्ग हा अंधेरी ते दहिसर पूर्व मेट्रोमार्ग-७ चा विस्तारित भाग असल्याने त्यातच आर्थिक तरतूद असून कामाची निविदा प्रक्रियाही सुरू झाल्याचा दावा एकीकडे आमदार नरेंद्र मेहता यांनी केला असताना दुसरीकडे महासभेत उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी मात्र मेट्रोच्या कामाचा विकास आराखडा झालेला आहे

The allegations of confusion among the BJP on the Metro, the CM has deceived the people | मेट्रोवरून भाजपामध्येच संभ्रम, मुख्यमंत्र्यांनी नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप

मेट्रोवरून भाजपामध्येच संभ्रम, मुख्यमंत्र्यांनी नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप

Next

मीरा रोड : मीरा-भार्इंदर मेट्रोचा मार्ग हा अंधेरी ते दहिसर पूर्व मेट्रोमार्ग-७ चा विस्तारित भाग असल्याने त्यातच आर्थिक तरतूद असून कामाची निविदा प्रक्रियाही सुरू झाल्याचा दावा एकीकडे आमदार नरेंद्र मेहता यांनी केला असताना दुसरीकडे महासभेत उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी मात्र मेट्रोच्या कामाचा विकास आराखडा झालेला आहे, पण अजून मंजूर झाला नसल्याने अंदाजपत्रकात तरतूद केली नसल्याचे सांगितल्याने आमदार खरे की उपमहापौर, असा प्रश्न मेट्रोसाठी आंदोलन करणाऱ्या नागरिक अधिकार मंचने उपस्थित केला आहे. तर, एमएमआरडीएच्या संकेतस्थळावर अंधेरी ते दहिसर पूर्वपर्यंतच्याच मेट्रो मार्गाचे नकाशे व माहिती असल्याने सत्ताधारी भाजपाने नागरिकांची फसवणूक केल्याची टीका होत आहे.
मीरा-भार्इंदर मेट्रोसाठी नागरिक अधिकार मंचच्या माध्यमातून विविध संस्था व नागरिकांनी मेट्रोसाठी आंदोलन चालवले होते. दुसरीकडे शिवसेना खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक यांनी कासारवडवली ते काशिमीरा-दहिसर तसेच मीरा-भार्इंदर मेट्रोची मागणी चालवली होती. काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी तर काँग्रेस काळात मीरा-भार्इंदर व विरारपर्यंत मंजूर मेट्रो भाजपाने रद्द केल्याचा आरोप करत आंदोलन केले होते. माजी खासदार संजीव नाईक , माजी महापौर गीता जैन आदींनीदेखील मेट्रोची मागणी केली होती.
मीरा-भार्इंदरसाठी मेट्रो देण्याचे आश्वासन २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तर, आॅगस्ट २०१७ च्या पालिका निवडणुकीच्या प्रचारातही मुख्यमंत्र्यांनी शहरात मेट्रो आणण्याचे काम आम्ही केल्याचे म्हटले होते. आधी पैसे दिले, काम केले मग मते मागायला आलो, असे सांगतानाच मेट्रो आपण आणल्याचा दावा अन्य जण करत असल्याचा टोला त्यांनी शिवसेनेला नाव न घेता लगावला होता. प्रचारात मेट्रोचा मुद्दा भाजपासह शिवसेनेनेदेखील घेतला होता. दरम्यान, आमदार मेहता यांनी मेट्रोसाठी आंदोलन करणाºया नागरिक अधिकार मंचच्या कार्यकर्त्यांना मीरा-भार्इंदर मेट्रो मंजूर झाली असून सहा महिन्यांआधीच आराखडा बनवण्याचे काम सुरू झाल्याचे सांगितले होते. मेहता तर मेट्रोची छोटी प्रतिकृतीच मुख्यमंत्र्यांपासून काहींना भेट देताना फोटो सोशल मीडियासह प्रसिद्धिमाध्यमां मध्ये चर्चेत आले होते. महापालिका निवडणुकीत भाजपाला तब्बल ६१ जागा जिंकून मोठे यश मिळाले. पालिकेत एकहाती सत्ता आली. गेल्यावर्षी तर शहरातील मेट्रो स्थानकांची नावे महासभेत ठरवण्यात आली. परंतु, एमएमआरडीएच्या २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात मात्र मीरा-भार्इंदर मेट्रोसाठी कुठलीच आर्थिक तरतूद नसल्याने मेट्रो रखडणार, असे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यावर शहरात भाजपा व स्थानिक नेतृत्वावर टीकेची झोड उठवण्याचे काम सोशल मीडियावर तसेच शिवसेना, काँग्रेस, मनसेसह नागरिक अधिकार मंचमधून होत आहे.
मेहतांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडीओमध्ये, तर अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रोमार्गाचे विस्तारीकरण मीरा-भार्इंदरपर्यंत झाले असल्याचे म्हटले आहे. हे विस्तारीकरणाचे काम असल्याने त्यासाठी वेगळी तरतूद करण्याची गरज नाही. विस्तारित मार्ग असल्याने वेगळ्या नावांचीही गरज नाही. अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो ७ च्या तरतुदींमध्येच मीरा-भार्इंदर मेट्रोचाही समावेश आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, ज्यांना बजेट कळत नाही, तांत्रिक माहिती नाही, असे लोक व विरोधक चुकीच्या अफवा पसरवत असल्याचे ते म्हणाले. तर, नुकत्याच झालेल्या महासभेत काँग्रेस नगरसेवक अनिल सावंत यांनी मेट्रोचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर, उपमहापौर वैती यांनी बोलताना मेट्रोचा आराखडा झाला असून अंतिम मंजुरी शिल्लक आहे. त्यामुळे अंदाजपत्रकात तरतूद झाली नसल्याचे म्हटले होते.
>‘वैतींवर ठेवू, पण मेहतांवर विश्वास नाही’
मेहता व वैती यांनी मेट्रोवरून दिलेल्या दोन वेगवेगळ्या माहितीवर प्रश्न उपस्थित करत नागरिक अधिकार मंचसह शिवसेना, काँग्रेस, मनसे आदींनी भाजपाची अडचण केली आहे. मंचचे भरत मिश्र म्हणाले की, मेहता म्हणतात वेगळ्या तरतुदीची गरज नाही. उपमहापौर मात्र आराखडा मंजूर नसल्याने तरतूद नसल्याचे म्हटल्याने नेमके खरे कोण, असा प्रश्न केला आहे.एकवेळ वैतींवर विश्वास ठेवता येईल, पण मेहतांवर नाही. मेट्रोच्या नावाखाली नागरिकांचीमुख्यमंत्री व आमदार यांनी फसवणूक केल्याचे मिश्र म्हणाले.
>मेहतांचे बोलणे
खोटे मानायचे?
विकास आराखडा मंजूर झाल्यावर अंदाजपत्रकात तरतूद होईल, अशी माहिती उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी मेट्रोबद्दल सभागृहात दिली होती. वैती यांच्यावर विश्वास ठेवला, तर मेहता हे धादांत खोटं बोलत असल्याचे मानायचे का, असा टोला अनिल सावंत यांनी लगावला आहे.
>भाजपाचा खोटारडेपणा नागरिकांपुढे झाला उघड
मेट्रोच्या मंजुरीसाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे गेली काही वर्षे सतत आंदोलन व पाठपुरावा करत होते. तर मेट्रो आम्ही मंजूर केल्याचे मुख्यमंत्री व स्थानिक नेते दावा करत होते.
पण, आता मेट्रोसाठी फुटकी कवडीदेखील अंदाजपत्रकात न ठेवल्याने भाजपाचा खोटारडेपणा उघड झाला आहे, अशी टीका शिवसेनेच्या नगरसेविका नीलम ढवण यांनी केली.
मेट्रो आणल्याचा खोटारडेपणा करत फसवणूक केली आहे. त्यामुळे आमदार खोटे की उपमहापौर खोटे, हे नागरिकांना भाजपानेच सांगितले पाहिजे, असे मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे म्हणाले.
>संकेतस्थळावर
मीरा-भार्इंदर मेट्रो नाहीच
एमएमआरडीएच्या संकेतस्थळावर अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो ७ च्या कामात तसेच नकाशातही मीरा- भार्इंदरचा लवलेश नाही. शिवाय, मेट्रो प्रकल्पात मीरा-भार्इंदरसाठी आर्थिक तरतूद केलेली नाही. त्यामुळे मेहता, भाजपा कितीही दावे करत असले, तरी ते पचनी पडण्यासारखे नाहीत.

Web Title: The allegations of confusion among the BJP on the Metro, the CM has deceived the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.