कथित आरोपी एसीपी निपुंगे अखेर निलंबित, ठाण्यातील महिला कॉन्स्टेबल आत्महत्या प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 05:18 AM2018-01-30T05:18:42+5:302018-01-30T05:19:27+5:30
महिला पोलीस कॉन्स्टेबल आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त एस.बी. निपुंगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर ते अद्यापही गैरहजर आहेत. हे प्रकरण अन्वेषणाधीन असल्यामुळे त्यांना राज्य शासनाने १० जानेवारीच्या आदेशानुसार खात्यातून अखेर निलंबित केले आहे.
- जितेंद्र कालेकर
ठाणे : महिला पोलीस कॉन्स्टेबल आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त एस.बी. निपुंगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर ते अद्यापही गैरहजर आहेत. हे प्रकरण अन्वेषणाधीन असल्यामुळे त्यांना राज्य शासनाने १० जानेवारीच्या आदेशानुसार खात्यातून अखेर निलंबित केले आहे.
ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील कॉन्स्टेबल सुभद्रा पवारला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या निपुंगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एन. बावनकर यांनी फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर त्यांना हा जामीन मंजूरही केला. त्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला.
आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारख्या गंभीर आरोपानंतर ते थेट सीक रजेवर गेले होते. प्रशासकीय शिस्त मोडल्यामुळे त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असा प्रस्तावच ठाणे पोलीस आयुक्तालयाने आॅक्टोबर २०१७ मध्ये राज्य शासनाकडे पाठवला होता. आपला या प्रकरणाशी अजिबात संबंध नसून तपास पथकाला सर्व प्रकारे सहकार्य करण्याची पूर्ण तयारी दर्शवणाºया निपुंगे यांनी ६ सप्टेंबरनंतर तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ किंवा पोलीस आयुक्तालयातील कोणत्याही वरिष्ठ अधिकाºयाकडे शरणागती पत्करली नाही. या प्रकरणातील अन्य एक सहआरोपी अमोल फापाळे याला चौकशीअंती २७ सप्टेंबर रोजी अटक केली. ६ सप्टेंबरपासून निपुंगे हे मात्र वैद्यकीय कारण देऊन दीर्घ रजेवर गेले. सुरुवातीला मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी त्यांना आजाराचे नेमके स्पष्टीकरण देण्यासाठी एक आठवड्यात हजर राहण्याचे किंवा तशी कागदपत्रे सादर करण्याचे आदेश नोटीसद्वारे दिले होते. तिलाही न जुमानता ते संपर्क कक्षाच्या बाहेरच राहिले. या गुन्ह्यातील आरोपांचा तपास अधिकारी रमेश धुमाळ यांचा अहवाल तसेच मुख्यालयाच्या उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या कार्यालयाचा बेकायदेशीरपणे सीक रजेवर गेल्याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. त्याची दखल घेऊन त्यांना पोलीस खात्यातून निलंबित केल्याचा आदेश राज्य शासनाने १० जानेवारी रोजी काढून निपुंगे यांच्या पुणे येथील घरी बजावला आहे. दरम्यान, एखाद्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटकेची कारवाई झाली की, संबंधित सरकारी अधिकाºयाला निलंबित केले जाते. परंतु, पवार हिच्या नातेवाइकांनी हे प्रकरण लावून धरले होते. शिवाय, त्यांच्यावर कारवाईची मागणीही केली होती. याच मागणीमुळे त्यांच्यावर हे निलंबन झाल्याची चर्चा आहे.
निपुंगे यांच्याविरुद्ध महिला पोलीस कॉन्स्टेबलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. याच कारणास्तव त्यांना राज्य शासनाने निलंबित केले आहे. तसा आदेश निपुंगे यांच्या पुण्यातील घरीही बजावण्यात आला आहे. - मकरंद रानडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, ठाणे शहर