बंडखोरी रोखण्यास ‘युती’ची हूल
By admin | Published: January 11, 2017 07:03 AM2017-01-11T07:03:57+5:302017-01-11T07:03:57+5:30
भाजपा आणि शिवसेना यांच्यातील महापालिका निवडणूक जागावाटपाच्या वाटाघाटी सुरु होत असल्याचे सांगितले जात असले तरी दोन्ही
ठाणे : भाजपा आणि शिवसेना यांच्यातील महापालिका निवडणूक जागावाटपाच्या वाटाघाटी सुरु होत असल्याचे सांगितले जात असले तरी दोन्ही पक्षातील बंडखोरांना रोखण्याकरिता युती होत असल्याची हूल उठवण्यात आली असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. स्वतंत्र लढून सत्तेकरिता एकत्र यायचे हेच धोरण या निवडणुकीतही अमलात आणले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
महापालिका निवडणुकांचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही. कार्यक्रम जाहीर झाल्यावर उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंतच्या काळात बंडखोर इकडून तिकडे पळ काढतात. भाजपा-शिवसेनेच्या वाटाघाटी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपेपर्यंत सुरु ठेवून ऐनवेळी दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले की, बंडखोरांना हालचाली करण्यास फारसा वाव उरत नाही. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत हीच रणनीती अमलात आणली होती. आता मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड अशा प्रमुख महापालिकांच्या निवडणुकीत तीच खेळी हे पक्ष खेळणार आहेत.
मुंबई, ठाण्यात आपला वॉर्ड युतीत भाजपाकडे राहणार की शिवसेनेकडे हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत बंडखोर पळ काढू शकत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक वाटाघाटींची भूमिका घेतली आहे. ठाण्यात गुरुवारी होणाऱ्या भाजपाच्या राज्य कार्यकारिणीचे कामकाज खुले ठेवलेले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या राज्य कार्यकारिणीत मधू चव्हाण व अन्य काही नेत्यांनी शिवसेनेसोबतची युती तोडण्याची भाषा केली होती. त्यानंतरही दोन्ही पक्षातील काही नेते अखेरपर्यंत वाटाघाटी करीत राहिले व अखेरीस युती तुटली होती. त्याचीच पुनरावृत्ती ठाण्यात अपेक्षित आहे. गुरुवारी काही भाजपा नेते शिवसेनेवर टीका करतील तर मुख्यमंत्री फडणवीस हे समन्वयवादी भूमिका घेतील, अशी चर्चा आहे.
युती करायची असेल तर सर्वत्र करा, अशी अट शिवसेनेने घातली आहे. मुंबई, ठाणे सोडले तर अन्यत्र भाजपाची लढाई ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसे यांच्याशी आहे. त्या ठिकाणी शिवसेनेला जागावाटपात भागीदार करुन घेण्यास स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे जागावाटपाची चर्चा ही धूळफेक असल्याचे जाणकारांचे मत आहे. (प्रतिनिधी)