कळवा-मुंब्य्रात जितेंद्र आव्हाडांना घेरण्याचा युतीचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 01:37 AM2019-08-23T01:37:14+5:302019-08-23T01:37:30+5:30

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळाली. सोबतच राष्ट्रवादीच्याही मतांची वाढ झाली आहे.

alliance tough fight to Awhad in Mumbra-kalwa | कळवा-मुंब्य्रात जितेंद्र आव्हाडांना घेरण्याचा युतीचा प्रयत्न

कळवा-मुंब्य्रात जितेंद्र आव्हाडांना घेरण्याचा युतीचा प्रयत्न

Next

- अजित मांडके

ठाणे : २००९ पासून कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीचा दबदबा आहे. २०१४ मध्ये भाजपची लाट असतानाही राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अधिकची मते मिळाली होती. भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात बोलणारे आव्हाड हे एकमेव शत्रू असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे त्यांना मतदारसंघात घेरण्याचा प्रयत्न युतीकडून सुरूझाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मंडळीसुद्धा या मतदारसंघात चाचपणी करताना दिसत आहेत. परंतु, या मतदारसंघातून कोण लढणार शिवसेना की भाजप, याबाबतची उत्सुकता शिगेला आहे. शिवाय, वंचित आघाडी आणि एमआयएम हासुद्धा या मतदारसंघात निर्णायक घटक मानला जात आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळाली. सोबतच राष्ट्रवादीच्याही मतांची वाढ झाली आहे. मागील वेळेप्रमाणे यावेळी मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न या मतदारसंघात होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार देऊन कळवा, विटावा पट्ट्यातील मतेसुद्धा आपल्या पारड्यात खेचण्याचा युतीचा प्रयत्न आहे. त्यानुसार, मागील काही महिन्यांत या मतदारसंघाचा अभ्यास सुरू आहे.
कळवा-मुंब्रा यासह राष्टÑवादीकडे ३१ नगरसेवकांचे पाठबळ येथे आहे. शिवसेनेला मात्र कळवा आणि मुंब्य्रात फटका बसला. कळव्यात शिवसेनेकडे केवळ सात नगरसेवक असून, तर मुंब्य्रात भोपळासुद्धा फोडता आलेला नाही. दरम्यान, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांना ८६ हजार ५३३ मते मिळाली होती. काँग्रेसच्या उमेदवाराला अवघी तीन हजार ८४७ मते मिळाली होती. तर, शिवसेनेला ३८ हजार ८५०, एमआयएमला १६ हजार ३७४ आणि भाजपला १२ हजार ८१८ मते मिळाली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय, लोकसभा निवडणुकीत या पट्ट्यात वंचित आघाडी चालली नसली, तरी विधानसभा निवडणुकीत तिचा उमेदवार निर्णायक भूमिकेत असणार आहे. एकूणच आता युतीकडून आव्हाड गड सर करण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. त्यामुळे ही जागा शिवसेना लढणार की भाजप, यावर सध्या या दोन्ही पक्षांचा अभ्यास सुरू आहे. शिवाय, एमआयएमलासुद्धा हाताशी घेण्याचा प्रयत्न या दोघांनी सुरू केला आहे.
मात्र, असे जरी असले तरी २००९ मध्ये कळवा-मुंब्य्राची असलेली परिस्थिती आणि आता २०१९ मध्ये बदललेली परिस्थिती ही आव्हाड यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे. सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेला आमदार म्हणूनही त्यांची या पट्ट्यात ओळख आहे. मागील १० वर्षांत दिलेली आश्वासने आणि त्या दृष्टीने केलेली वचनपूर्ती ही आव्हाडांसाठी जमेची बाजू मानली जात आहे. परंतु, भाजप सरकारच्या विरोधात तेवढ्याच ताकदीने बोलणारे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यामुळेच देशातील भाजपविरोधी असणाऱ्या मंडळींना जसे शांत केले, तसाच काहीसा प्रयत्न आता होताना दिसू लागला आहे.

Web Title: alliance tough fight to Awhad in Mumbra-kalwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे