आपत्तीग्रस्तांच्या वारसांना ३९ लाखांच्या मदतीचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:05 AM2017-09-01T01:05:35+5:302017-09-01T01:05:38+5:30
ठाणे जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली असताना दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीने तितक्याच प्रमाणात थैमान घातले. यामध्ये वित्तहानी झाली असून जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे.
ठाणे : ठाणे जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली असताना दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीने तितक्याच प्रमाणात थैमान घातले. यामध्ये वित्तहानी झाली असून जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या वारसांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने आतापर्यंत सुमारे ३९ लाखांची आर्थिक मदत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात अद्यापपर्यंत नैसर्गिक आपत्तीने बळी गेलेल्या २६ जणांपैकी ८ पात्र मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांप्रमाणे ३२ लाखांचे वाटप केले आहे. यामध्ये शहापूर तालुक्यात सर्वाधिक मदतीचे वाटप केले आहे.
जून महिन्यापासून पावसाचा जिल्ह्यात चांगला जोर पाहण्यास मिळाला. त्यातच जुलै महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंदही झाली आहे. त्यातच नदीनाले वाहू लागले, तर जिल्ह्यातील धरणांची दारे बºयाच प्रमाणात उघडण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. तसेच आॅगस्टमध्ये पावसाने दमदार बॅटिंग केली. याचदरम्यान, जिल्ह्यात सात तालुक्यांत जीवितहानी व वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत. १ जूनपासून १३ आॅगस्टपर्यंत २६ जणांचा बळी गेलेला आहे. यामध्ये कल्याण आणि मुरबाड तालुक्यांतील प्रत्येकी दोघे असे चौघे वाहून गेले आहेत. शहापूरमध्ये चौघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ठाण्यात पाच मुले तलावात बुडाली आहेत. कल्याणमध्ये तिघे नदीत पाण्यात बुडाली आहेत. उल्हासनगरमध्ये एकाचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. शहापूरमध्ये एक सर्पदंशाने, १ तलावात, ३ पाण्याच्या प्रवाहामध्ये, १ धबधब्यात, १ नदीत तर १ धरणात बुडाला आहे. मात्र भिवंडी आणि अंबरनाथ या तालुक्यांमध्ये बुडून किंवा वीज पडून कोणाचाही मृत्यू झालेला नाही.
या २६ जणांपैकी ९ जण पात्र ठरले आहेत. परंतु, ८ जणांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांप्रमाणे एकूण ३२ लाखांचे आर्थिक मदतीचे वाटप झाले आहे. त्यामध्ये कल्याण-२, शहापूर-४, उल्हासनगर आणि मुरबाड येथील प्रति एकाला मदत दिली असून मुरबाडच्या एकाचे प्रकरण प्रलंबित आहे. मुरबाडमध्ये मोठ्या प्रमाणात दुधाळ जनावरे असून १७ शेळ्या आणि २२ कोंबड्या मरण पावल्या होत्या.