भातसा प्रकल्पाच्या ९७ प्रकल्पग्रस्तांपैकी ४३ प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप
By सुरेश लोखंडे | Published: December 14, 2023 07:49 PM2023-12-14T19:49:37+5:302023-12-14T19:49:52+5:30
गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे.
ठाणे: गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. १९६७ साली भातसा प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात आले असता या शेतकऱ्यांनी शेत जमिनी दिल्या होत्या. त्यावेळी त्यांना जमिनीचा मोबदला देण्यात आला होता. मात्र त्यांचे पुनर्वसन दुसऱ्या ठिकाणी करण्यासाठीची मागणी होती. त्याप्रमाणे त्यांना भातसा नगर येथे ९७ भूखंड पाडण्यात येऊन त्या भूखंडाचे हस्तांतरण आता जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
या प्रकल्पाच्या ९७ प्रकल्पग्रस्तांपैकी ४३ प्रकल्पग्रस्तांना या भूखंडाचे प्रत्यक्ष ताबे देण्यात आले. इतर प्रकल्पग्रस्त मयत असून त्यांचे वारस तपास काम सुरू आहे . मात्र त्यांचे वारस सापडत नसल्याने भूखंड वाटपास विलंब होत आहे. संबंधित प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मूळ मयत प्रकल्पग्रस्तांच्या वारसांच्या नोंदी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेत जमा करावेत, असे आवाहन गायकर यांनी केले आहे.