प्रांत कार्यालयाकडून नागरिकांना सनदचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2023 01:42 PM2023-09-08T13:42:45+5:302023-09-08T13:43:04+5:30
माहिती अधिकार कार्यकर्ते मोती दुसेजा यांना बोगस गुन्ह्यात अडकविण्याचा प्रकार उघड होऊन, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी चार जणांना अटक केली.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : प्रांत कार्यालयाच्या वतीने जागेवर १९६२ पूर्वी पासून ताबा असणाऱ्या १० नागरिकांना जमीन मालकी हक्क (सनद) आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी प्रांत अधिकारी विजय शर्मा यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
उल्हासनगरातील नागरिकांना सनद मिळणे आणि सनद पडताळणी लवकरात करून देण्याबाबत आमदार कुमार आयलानी यांनी तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांची भेट घेऊन मागणी केली होती. जयराज कारभारी यांनी (सनद) जमीन मालकी हक्कासाठी नागरिकांनी प्रांत कार्यालय यांच्याशी संपर्क करून कागदपत्राची पूर्तता करण्याचें आवाहन केले होते. विशिष्ट नमुन्यात नागरिकांनी अर्ज केल्यावर सादर केलेल्या कागदपत्राची पडताडणी करून जागेचे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले. जे अर्ज नियमात बसतात अश्या नागरिकांना सनद जाहीर केल्या आहेत. बुधवारी एकून १० नागरिकांना सनदचे वाटप आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते झाले. सनद घोषित केल्यावर, शासन शुल्क नागरिकांनी भरल्यावर जागा त्यांच्या मालकीची होणार आहे. अशी माहिती यावेळी आयलानी यांनी दिली. प्रांत कार्यालयाकडे आलेल्या सनद अर्जाचा निपटारा केल्यास असंख्य जणांना जागेची मालकीहक्क मिळणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
नवनियुक्त प्रांत अधिकारी विजय शर्मा यांनी सनद देण्याच्या कामाला गती देणार असल्याचे संकेत दिले. प्रांत कार्यालयात सनद घोटाळा गाजला असून बनावट सनद देण्यावरून नागरिकांनी व व्यापारी संघटनेने कार्यालयावर मोर्चा काढून चौकशीची मागणी केली होती. चौकशीत काही सनद जमावबंदी आयुक्तांनी रद्द करून इतर सनदची चौकशी सुरू आहे. कॅम्प नं-५ कुर्ला कॅम्प कैलास कॉणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या निवासीस्थान व खुल्या जागेवरील सनद, विठ्ठलवाडी पोलीस वसाहतीवरील सनद, कॅम्प नं-५ मासे बाजार येथील महापालिका शाळा मैदानावर दिलेली सनद, अनेक सामाजिक संस्थेच्या जागेवरील सनद आदी असंख्य दिलेल्या सनद वादात सापडल्या आहेत.
प्रांत कार्यालय व पोलीस अधिकारी टार्गेटवर?
माहिती अधिकार कार्यकर्ते मोती दुसेजा यांना बोगस गुन्ह्यात अडकविण्याचा प्रकार उघड होऊन, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी चार जणांना अटक केली. यामध्ये मध्यवर्ती पोलीस वादात सापडले असून प्रांत कार्यालयातील मोठे अधिकारी पोलिसांच्या टार्गेटवर आहेत.