बेघर मुलांचा सरकारला आधार, स्वत: तयार केलेली भाजी आणि मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 02:58 PM2020-04-06T14:58:53+5:302020-04-06T14:59:26+5:30
कोरोनासाठी सर्वच पातळीवरुन मदतीचा हात पुढा होत आहे. अशातच समतोल फाऊंडेशनच्या मुलांनी देखील स्वत: पिकवलेली भाजी आणि तयार केलेले मास्क मोफत वाटण्याचे मोलाचे काम करीत आहेत.
ठाणे : कोरोनाला पराभूत करण्यासाठी सरकार आणि शासनाला अनेक सामाजिक संस्था हातभार लावत आहेत. घरातून पळून आलेल्या रस्त्यावरील मुलांनीही आपला खारीचा वाटा देत सरकारच्या कामात हातभार लावण्यासाठी पाऊल उचलले आहे. सरकारच्या नजरेतून दुर्लक्षित राहिलेल्या वीटभट्टी मजूर, बालसुधार गृहातील बालके आणि रस्त्यावरील मुलांना मास्क आणि भाजीपाल्यांचे वाटप केले. विशेष म्हणजे हे मास्क आणि भाजीपाला त्यांनीच तयार केला आहे.
रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे त्यांच्याच कुटुंबात संगोपालन व्हावे यासाठी समतोल फाउंडेशन ही सेवाभावी संस्था काम करते. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे संस्थेचे घरातून पळून आलेल्या मुलांचे शेल्टर आहे. त्याचप्रमाणे मुरबाड येथे मनपरिवर्तन केंद्र आहे. या ठिकाणी रस्त्यावर सापडलेल्या मुलांसोबत विविध प्रकारचे उपक्र म राबवीत त्यांचे मनपरिवतर्न केले जाते. त्यांना पुन्हा घरी जाणयासाठी तयार केले जाते. सद्य स्थितीत या केंद्रात २२ मुले आहेत. देशात आणि राज्यात कोरोनाचा व्हायरस पसरल्याने संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे गरिबांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. हा व्हायरस आता खेड्या पाड्यातही पोहचू लागला आहे. त्यांच्या हाताला काही काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळे आली आहे. मात्र रस्त्यावरील मुलांनी आता या गरजुंच्या मदतीला धावून जाण्याचा निर्णय घेतला आहे. मनपरिवर्तन केंद्रात ही मुले स्वत: सेंद्रिय पद्धतीने भाजीपाल्याची शेती करतात. तसेच स्वत: शिवण यंत्रावर मास्क शिवतात. त्याचबरोबर आयर्वेदिक नर्सरी देखील येथे तयार केलेली आहे. सोलरींग गोसेवा देखील चालविली जाते. केंद्राच्या आजुबाजुला अदिवासी पाडे व वीटभट्ट्या आहेत. तेथील मजुरांना या मुलांनी स्वत: भाजीपाला पिकवून तो तेथील मजुरांना देत आहेत. त्यासोबतच आपल्यासारख्याच बालसुधार गृहात असलेल्या उल्हासनगर येथील मुलांसाठी देखील भाजीपाला पाठवित आहेत. तयार केलेले मास्क सुद्धा त्यांनी वाटले आहेत. सध्या या मुलांनी पिकविलेल्या भाजीपाला आणि मास्कचा मजुर आणि बालसुधार गृहातील मुलांना मोठा आधार होत आहे. स्वत:ची काळजी घेत ही मुले कोरोनाच्या संकटात सापडलेल्या इतरांचाही आधार बनत आहेत.
राज्यातील वेगवेगळ्या भागातून घरातून पळून आलेली मुले येथे राहतात. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या मुलांना रेल्वे स्टेशन, एसटी डेपो सारख्या ठिकाणाहून आणले जाते. घरातून पळून येण्याचे अनेकांचे कारण घरातील गरिबी असते. येथे त्यांचे मनपरिवर्तन करून त्यांना व्यवसायिक प्रशिक्षण देऊन परत त्यांच्या आईवडीलांच्या ताब्यात दिले जाते. सध्या २० मुले येथे असून ते मास्क शिवण्यासोबतच भाजी पिकवणे यासारखी कामे करतात, ही मास्क आणि भाजीपाला गरजूंना वाटला जातो.
- विजय जाधव, अध्यक्ष समतोल फाउंडेशन