हॉटेल रात्रीपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा द्या; डोंबिवली हॉटेल ओनर्स असोसिएशनची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 01:19 AM2020-10-08T01:19:10+5:302020-10-08T01:19:22+5:30
आज घेणार मनपा आयुक्तांची भेट
डोंबिवली : उल्हासनगर येथील हॉटेल रात्री १० पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी दिली आहे, तशीच ती कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतही रात्रीपर्यंत सुरू ठेवण्याची अनुमती देण्याची मागणी कल्याण-डोंबिवली हॉटेल ओनर्स असोसिएशनने केली आहे. केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची उद्या हॉटेलमालकांचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष अजित शेट्टी म्हणाले की, हॉटेल चालवण्याची वेळ वाढवून देण्यासाठी खा.डॉ श्रीकांत शिंदे यांना भेटून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही साकडे घालण्यात येणार आहे. सातत्याने सांगूनही मनपा प्रशासन वेळ वाढवून देण्यास सहकार्य करीत नसल्याने अनेक व्यावसायिक नाराज आहेत. पार्सल सेवा सुरू असली, तरी ग्राहकांकडून आता मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची मागणी सुरू झाली आहे, पण या मनपा क्षेत्रात ७ वा.नंतर हॉटेल बंद करण्याची सक्ती होत आहे. गेले सहा महिने व्यवसाय ठप्प होता. आता सुरुवात झाली तर वेळेचे निर्बंध आहे. उल्हासनगरसारखी केडीएमसी हद्दीतही वेळ वाढवून द्यावी, असे ते म्हणाले. उद्या मनपा आयुक्त सूर्यवंशी यांनी भेटायला बोलावल्याचे शेट्टी म्हणाले.