कसारा, खोपोलीच्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:43 AM2021-05-20T04:43:28+5:302021-05-20T04:43:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि खोपोलीपर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीला जाण्यासाठी लोकल प्रवास करण्यास ...

Allow passengers from Kasara, Khopoli to travel by train | कसारा, खोपोलीच्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा द्या

कसारा, खोपोलीच्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा द्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि खोपोलीपर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीला जाण्यासाठी लोकल प्रवास करण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

कोरोनाला आळा घालण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाची चेन ब्रेक होईल हे माहीत नाही; पण कर्जत, खोपोली, कसारा या परिसरातून कल्याण मुंबईत लहान मोठ्या नोकऱ्या करून उदरनिर्वाह करणाऱ्या हजारो प्रवाशांचे कंबरडे मात्र साफ मोडून गेले आहे. कल्याण ते मुंबईदरम्यान रस्ते मार्ग प्रवास करता येतो. तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी उपलब्ध आहेत. परंतु, कल्याण-कसारा व खोपोलीपर्यंतच्या नागरिकांना लोकलशिवाय दुसरा वाहतुकीचा सक्षम पर्याय नाही. अर्थचक्र सुरळीत ठेवण्याची भाषा करीत हजारो कुटुंबाची उपासमार करायची, हा कुठला न्याय आहे, असा सवाल संघटनेने केला आहे.

कल्याण-कसारा व खोपोली मार्गावरून कार्यालयीन वेळेत दुतर्फा एसटी बस सुविधा राज्य सरकार देऊच शकत नाही, हे मागच्या लॉकडाऊनमध्ये स्पष्ट झाले आहे. या लॉकडाऊनमध्ये या भागात आता उपासमारीचे बळी जाण्याची शक्यता आहे. तरी उर्वरित काळात कल्याणपुढील सर्व सरकारी व खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना वैध ओळखपत्र वा अस्थापना

मालकाने दिलेले अधिकृत पत्र, यावर लोकलने प्रवास करण्याची परवानगी सरकारने द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. या मागणीचा गांभीर्याने विचार करून तत्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली.

-------------

Web Title: Allow passengers from Kasara, Khopoli to travel by train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.