मराठा सकल क्रांती मोर्चाची युतीला साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 02:34 AM2019-04-22T02:34:36+5:302019-04-22T06:32:49+5:30
जो उमेदवार मराठा म्हणून उभा आहे, त्याला आमचा जाहीर पाठिंबा असल्याची भूमिका ठाणे जिल्ह्यातील मराठा सकल क्रांती मोर्चाने घेतली.
ठाणे : जो उमेदवार मराठा म्हणून उभा आहे, त्याला आमचा जाहीर पाठिंबा असल्याची भूमिका ठाणे जिल्ह्यातील मराठा सकल क्रांती मोर्चाने घेतली. मात्र, ठाणे जिल्ह्यात आपण शिवसेना-भाजपसोबत असल्याचेही त्यांनी रविवारी स्पष्ट केले.
ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी मराठा समाजाचे प्रतिनिधी सुरेश माने, अविनाश पवार, रमेश आंब्रे, कैलाश म्हापदी आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. आमचे प्रश्न काही स्वरूपात सुटले आहेत, तर काही प्रश्न येत्या काळात सुटणार आहेत. केवळ जिल्ह्यातच नाही, तर राज्यात ज्या ज्या ठिकाणी मराठा समाजाचे उमेदवार असतील किंवा ज्यांनी मराठा क्रांती मोर्चात आम्हाला सहकार्य केले असेल, अशांनासुद्धा आमचा पाठिंबा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी कारण नसताना मराठा समाजातील उमेदवार उभे राहिले आहेत. त्यांना समजावण्याचे प्रयत्न केले होते. परंतु, त्यांनी माघार घेतलेली नाही. असे असले तरी त्यांनासुद्धा आमच्या शुभेच्छा आहेत, असेही ते म्हणाले.