आधीच ‘उल्हास’ त्यात उद्यानेही भकास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:39 AM2018-02-19T00:39:51+5:302018-02-19T00:39:53+5:30
सकाळी शुद्ध हवेत फिरायला जायला प्रत्येकाला आवडते. प्रकृतीसाठी ते चांगलेही असते. मात्र उल्हासनगरात आज एकही असे उद्यान नाही जेथे फिरायला जाता येईल, व्यायाम करता येईल, मोकळा श्वास घेता येईल
सदानंद नाईक, उल्हासनगर
सकाळी शुद्ध हवेत फिरायला जायला प्रत्येकाला आवडते. प्रकृतीसाठी ते चांगलेही असते. मात्र उल्हासनगरात आज एकही असे उद्यान नाही जेथे फिरायला जाता येईल, व्यायाम करता येईल, मोकळा श्वास घेता येईल. नगरसेवक आणि पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शहराचे आरोग्यच बिघडून गेले आहे. ते सुधारण्यासाठी हवी निरामय वृत्ती. पण तिचीच वानवा आहे.
शहरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा पुरवण्याचे महापालिकेचे कर्तव्य आहे. पण प्रत्येक गोष्टीतून स्वत:चा आर्थिक लाभ करून घ्यायचा या उद्देशामुळे कामात नित्कृष्टपणा येतो. त्यामुळे त्यावर खर्च झालेली रक्कम वाया जाते. अर्थात हा पैसा नागरिकांच्या विविध प्रकारच्या करातून जामा झालेला असतो. याचाच अर्थ नागरिकांच्या पैशांची पालिका, अधिकारी, नगरसेवक नासाडी करतात असा थेट होतो. पण नागरिक रस्त्यावर उतरून थेट विरोध करत नसल्याने या मंडळींचे चांगलेच फावते. वास्तविक आपल्या हक्कांसाठी सामान्य माणसाने आवाज उठवला पाहिजे.
आज उल्हासनगर शहरात असे एकही काम नाही ज्यात भ्रष्टाचार झालेला नाही. पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार, राजकीय पक्षांचे त्रांगडे, यामुळे त्यांचाच प्रशासनावर वचक राहिलेला नाही. उल्हासनगर पालिकेत भाजपाने अन्य पक्षांच्या कुबड्या घेऊन सत्ता मिळवली. शहराचा विकास होईल अशी माफक अपेक्षा नागरिकांची आहे. पण शहरातील स्थिती पाहता ‘विकास’ शोधावा लागतो. आज सिमेंटच्या जंगलात निसर्ग हरवत चाललेला आहे. सकाळी शुद्ध हवा घ्यायची ठरवली तरी ती मिळत नाही. कारण झाडेच लावली जात नाही. किंवा विकासाच्या नावाखाली कत्तल केली जाते. नागरिकांचा विरंगुळा व्हावा यासाठी शहरात मैदान, उद्याने यांची सुविधा पालिकेने करून देणे गरजेचे आहे. तशी उल्हासनगरमध्ये ६४ उद्याने आहेत. पण त्यातील हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच चांगली आहे. बाकी उद्यानांबद्दल न बोलले बरे. कोट्यवधी खर्च करूनही त्यांची दुरवस्था झालेली आहे. ही उद्याने म्हणजे भुरटे चोर, गर्दुल्ले यांची आश्रयस्थान झाल्याने नागरिक खास करून महिला, तरूणी फिरायला जाण्याचे टाळतात.
या उद्यानांकडे पाहून त्यांना उद्यान का म्हणावे असा प्रश्न सामान्यांना पडतो. इतकी त्यांची वाट लागलेली आहे. काही ठिकाणी चक्क गाडयांचे पार्किंग केले जाते. शहरात चांगल्या सुविधा असाव्यात असा साक्षात्कार पालिकेला झाल्याने २०१७-१८ मध्ये उद्यानांच्या विकासासाठी ८ कोटीचा निधी खर्च करण्यात येणार असून माळी, मजूर व सुरक्षारक्षक मानधनवर कंत्राटदाराकडून घेण्यात येणार आहे.
उल्हासनगरमध्ये खुल्या जागा, आरक्षित भूखंड, उद्याने, मैदान सुरक्षित नसल्याचे बोलले जाते. महापालिकेच्या ७० टक्के आरक्षित भूखंडावर अतिक्रमण झाले असून मुख्यालयासमोरील लहान उद्यानावर एका भूमाफियाने चक्क बांधकाम परवाना काढला होता. हा प्रकार उघड झाल्यावर उद्यानाच्या विकासाचा प्रश्न उभा ठाकला. या उद्यानाचे सुशोभिकरण व नूतनीकरण महापालिकेने केले असून कॅम्प नं-५ येथील लाललोई उद्यान कोटयवधीच्या निधीतून माजी उपमहापौर विनोद ठाकूर यांनी विकसित केले. माजी महापौर आशा इदनानी यांनी कॅम्प नं-३ येथील ७०५ भूखंडावर उघान विकसित केले. शेकडो नागरिक, महिला, वृध्द मुले उघानाचा उपयोग करतात.