रेल्वेनंतर शाळा परिसरातल्या फेरीवाल्यांनासुद्धा हटवा; अन्यथा पुन्हा खळ्ळ खट्याक, मनविसेचा पालिकेला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2017 04:43 PM2017-11-05T16:43:57+5:302017-11-05T17:16:59+5:30
भाईंदर - मनसेने मुंबईसह ठाणे, मीरा-भार्इंदर रेल्वे परिसरात बेकायदेशीरपणे ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांवर खळ्ळ खट्याक केल्यानंतर आता मीरा-भार्इंदरमधील शाळेच्या परिसरात बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांना हटवा, अशी मनसेची मागणी आहे.
भाईंदर - मनसेने मुंबईसह ठाणे, मीरा-भार्इंदर रेल्वे परिसरात बेकायदेशीरपणे ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांवर खळ्ळ खट्याक केल्यानंतर आता मीरा-भार्इंदरमधील शाळेच्या परिसरात बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांना हटवा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) पालिकेकडे करून अन्यथा पुन्हा खळ्ळ खट्याक केले जाईल, असा इशारा पालिकेला दिला आहे.
पालिका हद्दीत अनेक पालिका तसेच खासगी शाळा आहेत. या बहुतांशी शाळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फेरीवाले आपले बस्तान मांडून विद्यार्थी, शिक्षक व पालकांना शाळेत ये-जा करण्यास अडचण निर्माण करतात. काही शाळांच्या परिसरातील वाहतुकीचा रस्ताही फेरीवाल्यांकडून व्यापला जातो. त्यामुळे शाळा भरण्याच्या तसेच सुटण्याच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याविरोधात अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे प्रशासनाने केवळ राजकीय दबावासह आर्थिक तडजोडीपोटी दुर्लक्ष केले आहे. काही फेरीवाल्यांनी तर आपण आठवड्याला २०० ते ३०० रुपये हप्ता देत असल्याचे सांगून तेथून हटण्यास नकार दिल्याने फेरीवाल्यांच्या विस्तारात आर्थिक तडजोड असल्याचेच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शाळा परिसरातील फेरीवाल्यांच्या बेकायदेशीर गर्दीत अपघाताची शक्यता बळावते.
अशा संभाव्य घटना टाळण्यासाठी मनसेने ज्याप्रमाणे मीरा रोड रेल्वे परिसरात ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांना हुसकावुन लावले. त्याच धर्तीवर पालिकेने शाळा परिसरात बेकायदेशीर ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांना १५ दिवसांत हटवावे. तसेच शाळेचा १०० मीटरपर्यंतचा परिसर मोकळा ठेवावा, अशी मागणी मनविसेने पालिकेकडे केली आहे. तसे न झाल्यास पुन्हा खळ्ळ खट्याक केले जाईल, असा इशारा दिला आहे. तसे निवेदन सहाय्यक आयुक्त स्वाती देशपांडे यांना देण्यात आले. त्यावेळी मनविसेचे शहर सचिव शान पवार, विभागीय सचिव प्रमोद देठे, गणेश बामणे, दादा कदम, साई परब, वैभव ओझा, महेश चव्हाण, इरफान सय्यद, सुनील लोखंडे आदी उपस्थित होते.