साउंड सिस्टिमला पर्याय पारंपरिक वाद्यांचा , म्यूट डे च्या घोषणेमुळे आयोजकांचा पवित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 05:53 AM2017-08-12T05:53:13+5:302017-08-12T05:53:13+5:30
डेसिबलची मर्यादा वाढवून देण्याच्या मागणीसाठी पाला संघटनेने १५ आॅगस्टला साउंड म्यूट डे जाहीर केल्यामुळे स्वातंत्र्य दिन तसेच यंदाच्या दहीहंडी उत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
- स्नेहा पावसकर
ठाणे : डेसिबलची मर्यादा वाढवून देण्याच्या मागणीसाठी पाला संघटनेने १५ आॅगस्टला साउंड म्यूट डे जाहीर केल्यामुळे स्वातंत्र्य दिन तसेच यंदाच्या दहीहंडी उत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले आहे. मात्र, ढोलताशे अशी पारंपरिक वाद्ये वाजवणे तसेच एखाद्या सहकारी किंवा सदस्याच्या घरातील साउंड सिस्टिमचा वापर करणे, अशा पर्यायांचा अवलंब करण्याची दहीहंडी आयोजकांची तयारी दिसते आहे.
या वर्षी न्यायालयाने दहीहंडीवरील निर्बंध उठवल्याने गोविंदांसह सर्वसामान्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच, १५ आॅगस्टलाच यंदा दहीहंडी असल्याने दोन सणांचा आनंद लुटता येणार आहे. मात्र, ऐन या उत्सवाच्याच दिवशी प्रोफेशनल आॅडिओ अॅण्ड लायटिंग असोसिएशनने म्यूट डे जाहीर केल्याने उत्सवाचे वातावरणच जणू म्यूट झाले. स्वातंत्र्यदिनी ठिकठिकाणी झेंडावंदनानंतर देशभक्तीपर गीतांचे कार्यक्रम होतात.
या सगळ्यात साउंड सिस्टिमचा वापर केला जातो. तर, दहीहंडी उत्सव हा साउंड सिस्टिमशिवाय जणू कठीणच वाटतो. थरथराटानंतर डीजेच्या तालावर गोविंदा थिरकतात, तर सेलिबे्रटींसह मनोरंजनाच्या कार्यक्रमातही साउंड सिस्टिम अविभाज्य घटक असतो. मात्र, त्याच दिवशी म्यूट डे जाहीर केल्यामुळे यंदा या सिस्टिमचा वापर करता येणार नाही. त्यामुळे आयोजकांनी पारंपरिक वाद्ये हा साउंड सिस्टिमला पर्याय ठेवला आहे. तर, बहुतांशी दहीहंडी उत्सवाचे आयोजक विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी असल्याने जिथे खरेच आवश्यकता असेल, तिथे ग्रुपमधील कोणाचीही साउंड सिस्टिम उपलब्ध करू, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
आम्ही दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करणार आहोत. डीजेचा वापर करणार नाही. हे आधीच जाहीर केले आहे. मात्र, मोठ्या समूहाला संबोधित करण्यासाठी साउंड सिस्टिमची गरज भासते. त्यामुळे त्यादृष्टीने आमच्यातील एखाद्या सहकाºयाच्या घरातील साउंड सिस्टिमचा आम्ही वापर करू. मात्र, त्यातही डेसिबलबाबत नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेऊ.
- अविनाश जाधव, आयोजक, मनसे ठाणे शहर दहीहंडी उत्सव
दहीहंडी उत्सवात डीजेचा वापर केला जात असला, तरी यंदा म्यूट डे जाहीर केला आहे. त्यामुळे यंदाच्या उत्सवात आम्ही पारंपरिक वाद्यांचा वापर करू. तसेच साउंड सिस्टिम जिथे आवश्यक असेल, तिथे आमच्या खाजगी साउंड सिस्टिमचा वापर करण्याच्या विचारात आहोत.
- संजय भोईर, आयोजक, साई जलाराम प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव
यंदा दहीहंडीच्या दिवशी म्यूट डे घोषित केलेला असला, तरी संस्कृ तीचा दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा होणारच आहे. पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करून संस्कृती प्रतिष्ठान आपली संस्कृती जपेल.
- पूर्वेश सरनाईक, आयोजक
संस्कृ ती प्रतिष्ठान
यापूर्वी मोठ्या साउंड सिस्टिम नव्हत्या. तेव्हाही दहीहंडी उत्सव साजरा होतच होता. हल्ली मोठ्या दणदणाटावर गोविंदा नाचतात. पण जे जुने गोविंदा आहेत, त्यांना पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरायला आवडतो. त्यामुळे यंदा म्यूट डे जरी जाहीर केला असला तरी गोविंदांचा उत्साह कायम असेल.
- समीर पेंढारे, अध्यक्ष, ठाणे जिल्हा दहीहंडी समन्वय समिती