दाेनाचे तीन झाले, तरी वाढीव भाडे कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:47 AM2021-03-01T04:47:55+5:302021-03-01T04:47:55+5:30
अंबरनाथ आणि बदलापुरात पूर्वी प्रत्येक ऑटो रिक्षाचालक हा चार ते पाच सीट भरून प्रवास करत होता. मात्र, दोन वर्षापूर्वी ...
अंबरनाथ आणि बदलापुरात पूर्वी प्रत्येक ऑटो रिक्षाचालक हा चार ते पाच सीट भरून प्रवास करत होता. मात्र, दोन वर्षापूर्वी वाहतूक पोलीस आणि रिक्षाचालक संघटनेच्या पुढाकाराने प्रत्येक रिक्षात केवळ तीन सीट घेण्याची सक्ती करण्यात आली. त्या मोबदल्यात प्रतिप्रवासी १० रुपये एवजी १५ रुपये भाडे करण्यात आले. या नियमांची अंमलबजावणी केवळ काही रिक्षाचालकच करीत होते. उर्वरित बेशिस्त रिक्षाचालक हे ओव्हर सीट भरून इतर प्रामाणिक रिक्षाचालकांना त्रास देत होते. त्यातच कोराेनाकाळात शासकीय नियमानुसार रिक्षामध्ये केवळ दोन प्रवासी घेण्याचा नियम पुढे केल्याने प्रतिप्रवसी भाडे १५ ऐवजी २० रुपये करण्यात आले. ते दर प्रवाशांनी दिलेही. मात्र आता कोविडचा प्रभाव कमी झाल्यावर रिक्षाचालकांनी पुन्हा तीन सीट भरण्यास सुरुवात केली आहे. यानंतर काही प्रमाणिक रिक्षाचालक वगळता बेशिस्त रिक्षाचालक हे २० रुपये दर आकारत आहेत. यासोबतच पेट्रोलचे दरवाढ कारण पुढे करून रिक्षा भाडेवाढ करण्याचा घाट रचला जात आहे. प्रत्यक्षात अंबरनाथ आणि बदलापुरात सर्वच रिक्षा या सीएनजीवर आहेत. असे असतानाही पेट्रोल दरवाढीमुळे भाडेवाढ करणे अंबरनाथ आणि बदलापूरकरांना पचनी पडत नाही. भाडेवाढीबाबत ठोस निर्णय झालेला नसला तरी त्याबाबत चर्चा होणेही चुकीचे आहे.